अत्याचाराविरोधात शाळा, महाविद्यालयांत ‘चिराग अॅप’

- विद्यार्थ्यांची हजेरी तीनवेळा नोंदणी बंधनकारक
- गैरहजर विद्यार्थ्यांचा संदेश पालकांना
पुणे – शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना आता महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या “चिराग अॅप’ची माहिती विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असेल. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांची हजेरीही सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळी असे तीन वेळा नोंदवायची आहे. अनुपस्थित विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे संदेश पाठविणे शाळांना बंधनकारक राहणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा त्यामागील हेतू आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेत तक्रार पेटी, पुरेसे सीसीटीव्ही, प्रवेशद्वाराजवळ महिला वा पुरुष सुरक्षारक्षक नेमावे लागणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी ही मार्गदर्शक तत्त्वे आज जारी केली आहेत. त्यानुसार शाळेने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
शाळेतील मुलांच्या उपस्थितीच्या नोंदी तीन वेळा ठेवायच्या आहेत. अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे संदेशही पाठवावे लागणार आहेत. याशिवाय शाळा व्यवस्थापनाने शिक्षक, पालक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांची दक्षता समिती नेमायची आहे. चिराग अॅपचे फलक शाळेच्या दर्शनी भागात लावून, विद्यार्थ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी मदत शाळांना करावी लागणार आहे.