अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार; शहरात दोन ठिकाणी घटना

पुणे – शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोघांचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध मार्केटयार्ड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय काटकर (65, रा. माण. जि. सातारा) यांच्या दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या मुलगा चंद्रकांत (35, रा.बिबवेवाडी) याला 4 एप्रिल रोजी अज्ञात वाहनाने ठोकरले होते. मार्केट यार्ड येथील भुसार बाजाराजवळ रात्री हा अपघात झाला होता. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलाचा सर्व विधी आटोपल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस.धुमाळ तपास करत आहेत.
तर, दुसऱ्या एका घटनेत एका अनोळखी व्यक्तीचा अज्ञात वाहनाने ठोकरल्याने कात्रज येथील बीआरटी बस थांब्याजवळ मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली होती. अपघातानंतर वाहनचालक कोणतीही मदन न करता पसार झाला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी. एच. अहिवळे तपास करत आहेत