अजय देवगनच्या रिमेक चित्रपटात सोनाक्षी

बॉलीवूडची “दबंग’ गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या अन्य अभिनेत्रींच्या तुलनेत मागे पडल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षात सोनाक्षीचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तसेच सोनाक्षीने आता आपले वजन कमी केले असून तिचा लुक बदलला आहे. ती आता पूर्वीपेक्षा खूपच सुंदर दिसत आहे. सोनाक्षीने नुकताच एक चित्रपट साईन केला असून हा चित्रपट अजय देवगनच्या चित्रपटाचा रिमेक आहे.
अजय देवगनने मराठीत “आपला माणुस’ चित्रपटाची निर्मिती केली होती. यात त्याने एक छोटीशी भूमिकाही साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगला गल्लातर कमविला होताच आणि समिक्षकांचे मनेही जिंकली होती. आता आशुतोष गोवरीकर या चित्रपटाचा हिंदी रिमेक काढणार आहे. याबाबतचे हक्क त्याने खरेदी केले आहेत.
आशुतोषने चित्रपटाची स्क्रिप्ट सोनाक्षीला ऐकविली असून तिला स्क्रिप्ट आवडली आहे. यानंतर सोनाक्षीसाठी स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. आशुतोष गोवरीकरच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती होणार असून सतीश राजवाडे पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यामुळे सोनाक्षीच्या चाहत्यांना आतापासूनच चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.