अक्षय कुमारच्या “रावडी राठोड 2′ ची तयारी सुरू

अक्षय कुमार एकापाठोपाठ एक सिनेमे साईन करतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्याच्याकडे सिक्वेल सिनेमांची रांग लागलेली आहे, हे फार कमी जणांना माहित असेल. यामध्ये “हाऊसफुल्ल 4′ आणि “हेराफेरी 3’या धमाल कॉमेडी सिनेमांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. त्याबरोबर आता ऍक्शनपॅड “रावडी राठोड’चाही पुढचा भाग अक्षय करणार आहे. या सिनेमाच्या स्क्रीप्टवर सध्या जोरात काम सुरू आहे.
“रावडी राठोड 2’ची स्क्रीप्टही तयार आहे केवळ संजय लीला भन्साळींकडून या सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला जाणे बाकी आहे. त्यांनी परवानगी दिली, की लगेचच “रावडी राठोड 2’चे काम सुरू होईल, असे कोप्रोड्युसर सबीना खान यांनी सांगितले. अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाचे लीड रोल असलेला “रावडी राठोड’ 2012 साली सुपरहिट झाला होता आणि सिनेमाने 100 कोटींपेक्षा जास्तीचा धंदाही केला होता.
अक्षयकडे सध्या बऱ्याच सिनेमांची गर्दी आहे. रजनीकांतबरोबरचा “2.0′, रीमा कागदीचा “गोल्ड’, करण जोहरचे प्रोडक्शन असलेला “केसरी’, “हाऊसफुल्ल 4’आणि “हेराफेरी 3′ हे तर त्याच्या हातातले सिनेमे आहेत. त्याबरोबर अक्षयच्या “वेलकम 3’चीही जोरात चर्चा सुरू आहे. त्याबरोबर नीरज पांडेच्याही एका सिनेमात अक्षय काम करणार आहे.