breaking-newsराष्ट्रिय

अकार्यक्षम मंत्र्यांमुळेच पक्षाचे बुरे दिन; भाजपा आमदारांकडून घरचा आहेर

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कैराना आणि नुरपूरमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला. या पराभवावरुन आता भाजपाच्या दोन आमदारांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ‘राज्य सरकारने अनियंत्रित भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम मंत्र्यांविरोधात कारवाई करायला हवी. अशी कारवाई झाली, तरच पुढील निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी सुधारेल,’ असे भाजपाच्या दोन आमदारांनी म्हटले आहे.

गोपामाई मतदारसंघाचे आमदार शाम प्रकाश यांनी कैराना, नुरपूरमधील पराभवासाठी थेट स्वत:च्या सरकारला जबाबदार धरलं आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश यांनी फेसबुकवर एक कविता लिहिली आहे. ‘पहले गोरखपूर, फूलपूर और अब कैराना, नुरपूर में बीजेपी की हार का हमें दु:ख है,’ असे त्यांनी कवितेत म्हटले आहे. मोदींच्या नावाने भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, पण सत्तेची सूत्रं संघाच्या हाती आहेत, असेही ते पुढे कवितेत म्हणत आहेत. ‘मोदी नाम से पा गये राज, कर ना सके जनता मन काज. संघ, संघटन हाथ लगाम, मुख्यमंत्री भी असहाय,’ असं प्रकाश यांनी कवितेत म्हटलं आहे.

भाजपाच्या बहुतांश आमदारांची मनातही याच भावना आहेत, असा दावादेखील प्रकाश यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केला. ‘अधिकारीवर्ग लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही, असा संदेश लोकांमध्ये जात आहे. अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे लोकांच्या मनात राग आहे. मुख्यमंत्र्यांना मोकळेपणानं काम करु दिले जात नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भाजपाचा राज्यातील भविष्य अंधकारमय असेल,’ असेही प्रकाश म्हणाले. बेरिया मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनीही राज्य सरकारच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता न दाखवल्यास जनता पुढील निवडणुकांमध्ये भाजपालाही घरचा रस्ता दाखवतील,’ अशा स्पष्ट शब्दांमध्ये सिंह यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button