अंतिम फेरीत भारताचा कझाकस्तानशी सामना
आशियाई महिला बास्केटबॉल स्पर्धा
यजमान भारताने हाँगकाँगचा ८३-३८ असा धुव्वा उडवून बंगळूरु येथे सुरू असलेल्या २४व्या आशियाई १८ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या ब विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सीरियाला ७६-५६ असे चकित करणाऱ्या कझाकस्तानशी भारताची अंतिम फेरीची लढत होईल.
हर्षिता, श्रीकला आणि दर्शिनीने आक्रमणात सुरेख समन्वय राखत भराभर गुण नोंदवून प्रतिस्पर्ध्याचा बचाव पूर्णपणे खिळखिळीत केला होता. कर्णधार पुष्पाने बचावात उत्कृष्ट कामगिरी करून हाँगकाँगच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली होती. २३-८ अशा मोठय़ा आघाडीनंतर हर्षिताने ऐश्वर्याच्या साथीने वारंवार प्रतिस्पध्र्याच्या संरक्षित क्षेत्रात मुसंडी मारून बास्केट नोंदवल्याने दबावाखाली आलेल्या हाँगकाँगच्या संघाने प्रतिकार करणे सोडून दिले आणि सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. उत्तरार्धात गुलाबशा अली आणि सृष्टी सुरेन या द्वयीने अचूक नेमबाजी करून संघाची आघाडी वाढवण्यास मदत केली. शेवटच्या सत्रात यजमानांनी आपल्या राखीव खेळाडूंना कोर्टवर उतरवून सामन्याचा सोपस्कार पार पाडला. गतवर्षी महिला आणि १६ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत भारताने कझाकस्तानचाच पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
निकाल – भारत ८३ ( हर्षिता १८, दर्शिनी १५, पुष्प १२, सृष्टी ११, ऐश्वर्या १०) विजयी विरुद्ध हाँगकाँग ३८ (विंग पून ११) २३-८, २८-१३, १७-२, १५-१५.