breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : मावळ लोकसभेतून पार्थ पवार राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार?

पिंपरी (महा ई न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढणार असल्याचे संकेत खुद्द अजित पवार यांनी आज मंगळवारी (दि. 2) एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे तिकीट आपल्यालाच मिळणार या अविर्भावात गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करणा-या स्वयंघोषीत उमेदवारांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे मावळ लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार मानले जातात. निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी कामाला सुध्दा जोरात सुरूवात केली आहे. त्यांच्या  वाढदिवसाचे फ्लेक्स देखील मावळच्या खालच्या पट्ट्यात झळकले होते. गणेशोत्सवात मंडळाच्या आरत्या करण्यावर देखील त्यांनी याच भागात जोर दिला होता. दही हंडी साजरी करण्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या कार्यकर्त्यांना निराश करून लोणावळा गाठला होता. तेथील भागात त्यांनी दहीहंडी थाटात साजरी केली. एकंदरीतच संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकीटावर मावळातून लोकसभा निवडणूक लढणार, असे चित्र तयार झाले आहे.

त्यातच राष्ट्रवादीचे दस्तुरखुद्द कारभारी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार राहतील, असे संकेत दादांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहेत. त्यामुळे पार्थ पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर वाघेरे यांचा निश्चितच पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेली एवढी तयारी पाण्यात जाणार आहे. स्वत: पार्थच मावळातून इच्छुक असेल तर वाघेरे यांना या मतदार संघाची उमेदवारी मागण्याचे धाडस देखील करता येणार नाही. वाघेरेंची उमेदवारी कट झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये पक्षाविषयी नाराजी निर्माण होणार आहे. वाघेरेंना डावलून जर पार्थला उमेदवारी दिल्यास पिंपरी-चिंचवडमधील वाघेरे समर्थकांचे केवळ सतरंज्या उचलण्यातच आयुष्य जाणार आहे. त्यामुळे पक्षाकडून आपला केवळ वापर होतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली आहे.

आजची तरूण पिढी स्वताचे निर्णय स्वतः घेते. परंतु, याबाबत माझे त्याच्याशी बोलणे झालेले नाही. त्याला राजकारणाची आवड आहे. परंतु, त्याने अजुन तरी इच्छा व्यक्त केलेली नाही. 

अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button