breaking-newsपुणेमहाराष्ट्र

MPSC : निकाल लागला, पण वाटचाल दुर्देवी!

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी घेतलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल तब्बल दोन वर्षांनी बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. हा निकाल वेळेत लागावा, यासाठी खुद्द उमेदवारांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली, हे दुर्देव म्हणावे लागेल. न्यायालयात दिलेली मुदत संपण्यापूर्वी आयोगाने निकाल जाहीर केला. दोन वर्षांनंतरच्या निकालाने मात्र उमेदवारांच्या आयुष्याचे सर्वच नियोजन कोलमडले.

यूपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचा “ट्रेंड’ हल्ली वाढला आहे. दोन-तीन वर्ष परिश्रम घेत या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. त्यात ग्रामीण भागातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात येऊन मार्गदर्शन घेत स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांनाही यशही मिळत आहे. अशा स्थितीत आयोगही संभाव्य वेळापत्रक जाहीर करीत असल्याने, त्यानुसार उमेदवारही परीक्षांची तयारी करीत असतात.

राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी पीएसआय पदांच्या परीक्षेसाठी उमेदवारांचे वय तीन वर्षे वाढविण्याचा निर्णय घेत सर्वांना दिलासा दिला. त्याच दरम्यान झालेल्या पीएसआय परीक्षेला उमेदवारही मोठ्या संख्येने बसले. 2016 मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा झाली. त्यानंतर वर्ष, दीड वर्षे झाले तरी निकाल जाहीर होत नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती. त्याचा परिणाम पुढच्या परीक्षेवर झाला. निकाल न लागल्याने हेच उमेदवार 2017 व 2018 च्या परीक्षेतही होते. त्यामुळे नव्या उमेदवारांना संधी डावलत जात असल्याची भावना निर्माण झाली होती.

पीएसआय निकालाच्या विलंबाने उमेदवारांचे आर्थिक नुकसान होत होते. खानावळ, क्‍लास, रुम भाडे अशा खर्चात उमेदवारांचे दोन वर्षे गेले. त्यांचे सर्वच नियोजन कोलमडले. निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मात्र मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यात उमेदवारांना नैराश्‍यला सामोरे जावे लागत होते. या सर्व गोष्टीचा विचार करून आयोगाने निकाल वेळेत लावण्यात सातत्यपणा ठेवावा, अशी अपेक्षा उमेदवारांतून होत आहे.

मर्यादित वयाच्या निकषावर अपात्र होण्याच्या भीतीने उमेदवार परीक्षेची अहोरात्र परिश्रम घेतात. त्यात निकालास आयोगाकडून विलंब होत असल्यास हेच उमेदवार अन्य पर्यायाचा शोध घेतील. त्यातून त्यांचा मुख्य उद्देशच बाजूला पडण्याची शक्‍यता आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आयोगाने आतापर्यत घेतलेल्या परीक्षांचा निकाल वेळेत लावणे उमेदवारांच्या दृष्टीने संयुक्‍तिक ठरेल. त्यादृष्टीने आयोगाने पाऊल उचलणे अपेक्षित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button