breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

2006 मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट: 13 वर्षांनंतर आजही जखमा ताज्याच

11 जुलै 2006 हा दिवस कोणीही कधीही विसरू शकणार नाही. तब्बल 13 वर्षांनंतरही आज सर्वांच्याच जखमा ताज्याच आहेत. 11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी मुंबईतील उपनगरीय ट्रेनमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला आणि हा धमका मुंबईकरांना सुन्न करून गेला. त्यानंतर 11 मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले आणि त्यामध्ये 209 जणांचे बळी गेले. तसेच 824 जण जखमी झाले. एकामागून एक झालेल्या बॉम्बस्फोटांनी मुंबईकरांच्या पायाखालची जमीन सरकवलीच पण अनेक कुटुंबांचेही आधारस्तंभ हिरावून घेतले. पश्चिम रेल्वेच्या माहिम ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे बॉम्बस्फोट झाले. प्राथमिक तपासात हे बॉम्ब पहिल्या दर्जाच्या डब्यांमध्ये ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. तसेच हे बॉम्ब गोवंडीत तयार करण्यात आले असून यादरम्यान पाकिस्तानातून आलेल्या काही लोकांनीही त्यात मदत केल्याची माहिती समोर आली होती. 1993 साली बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबईकरांच्या पायाखालची जमीन सरकरवली होती.

बॉम्बस्फोटांनंतर 10 दिवसांच्या आतच दहशतवादविरोधी पथक दहशतवाद्यांपर्यंत पोहोचले होते. 20 जुलै ते 3 ऑक्टोबर 2006 दरम्यान एटीएसने अनेक दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती. पाकिस्तानची संस्था आयएसआयने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या मदतीने हे बॉम्बस्फोट घडवल्याचे समोर आले होते. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींचा संबंध सिमीशी असल्याची माहितीही मिळाली होती.

2008 मध्ये या घटनेतीच्या पार्श्वभूमीवर सादिक शेख, आरिफ शेख आणि मोहम्मद शेख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीनचे नावही समोर आले होते. पोलिसांच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळने हे बॉम्बस्फोट घडवले असल्याची कबुली तिघांनी दिली होती. त्यानंतर भटकळलाही अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयात जून 2007 साली या खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि 19 ऑगस्ट 2014 रोजी पूर्ण झाली. सुनावणीदरम्यान फेब्रुवारी 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवर स्थगिती आणली. कमाल अंसारी या आरोपीने मकोका कायद्याच्या वैधतेला आव्हान दिले होते. त्यानंतर 23 एप्रिल 2010 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू करण्यात आली.

सुनावणीदरम्यान तब्बल 192 साक्षीदार न्यायालयासमोर आले. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी, 8 डॉक्टर आणि 5 प्रशासकीय सेवेशी निगडीत अधिकाऱ्यांचा समावेश होता. या घटनेच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या. तसेच यामध्ये रॉ बरोबरच आयबीचीही मदत मागितली होती. तपासादरम्यान एकूण 400 जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, अखेरीस 13 आरोपीमधून 12 जणांना दोषी ठरवण्यात आले होते. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यानंतर देशभरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. या घटनेला आज 13 वर्षे होत असली तरी याच्या जखमा ताज्याच आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button