breaking-newsपुणेमहाराष्ट्र

१० हजार ८०० जागांवरच शिक्षक भरती?

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार शिक्षक भरतीची केलेली घोषणा हवेत विरणार आहे. बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेत सुमारे १० हजार ८०० जागाच भरल्या जातील असे चित्र असून त्यासाठी २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान पवित्र संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना खासगी संस्थांमध्ये मुलाखत द्यावी लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांतील भरती केवळ अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील गुणांच्या आधारे केली जाईल. स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, अल्पसंख्याक शाळा, इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळा, अनुकंपा तत्त्वावरील भरती या सर्व संस्थांमधील शिक्षक भरती पवित्र प्रणालीतून वगळण्यात आल्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या जागा कमी झाल्या. आता तब्बल १ लाख २१ हजार उमेदवारांमधून सुमारे १० हजार ८०० जागांवरच शिक्षक भरती होणार आहे. त्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या २ हजार ३०० जागा, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ८ हजार ५०० जागांचा समावेश आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षक भरतीसाठी बिंदुनामावली (रोस्टर) पुढील आदेश येईपर्यंत अद्ययावत करू नयेत असे आदेश संबंधित जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थांतील बिंदुनामावली अद्ययावत करण्यात आलेली नाही. तसेच खासगी शाळांमधीलही बिंदुनामावली अद्ययावत करण्यात आलेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

.. तरच १५ हजार जागांवर भरती!

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदवीधर शिक्षक आणि विनापदवीधर शिक्षक असे दोन संवर्ग आहेत. त्यापैकी पदवीधर शिक्षकांच्या भरतीबाबत नियमावली नसल्याने सुमारे ४ हजार शिक्षकांच्या जागांबाबत संभ्रम आहे. या बाबत शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभागाने समन्वयातून तोडगा काढल्यास १५ हजार जागांवर शिक्षक भरती होऊ शकेल.

शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शिक्षण विभाग वेगाने काम करत आहे. तसेच जास्तीत जास्त जागांवर शिक्षक भरतीचा प्रयत्न केला जात आहे. साधारणपणे दहा ते १५ हजार जागांवर भरती होण्याची शक्यता आहे. शिक्षक भरतीसाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांना सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती दिली. तसेच उपोषण सोडून मुलाखतीची तयारी करण्याचेही आवाहन केले.       – विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button