breaking-newsक्रिडा

‘ हे ‘ बदल केल्यास भारतीय संघ जिंकू शकतो तिसरा सामना

ठळक मुद्देभारताने 2007 साली या मैदानात एकमेव सामना जिंकला होता. भारताला जर या मैदानात विजयाची पुनरावृत्ती करायची असेल, तर काही गोष्टींमध्ये बदल त्यांना करावा लागेल.

प्रसाद लाड
क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना रंगला. भारताला या सामन्यात डावाने मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आपण कोसळताना पाहिला. पहिल्या कसोटीत सापडलेली लय गोलंदाजांनी या सामन्यात गमावली. भारत सध्याच्या घडीला 0-2 या फरकाने पिछाडीवर आहे. आता तिसरा सामना नॉटींगहॅममध्ये रंगणार आहे. या मैदानातील सहा सामन्यांपैकी भारताला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. भारताने 2007 साली या मैदानात एकमेव सामना जिंकला होता. भारताला जर या मैदानात विजयाची पुनरावृत्ती करायची असेल, तर काही गोष्टींमध्ये बदल त्यांना करावा लागेल.

सलामीचा तिढा : इंग्लंड दौऱ्यात फलंदाजी करताना सलामीची जोडी महत्त्वाची ठरते. कारण चेंडू जुना झाल्यावरच चांगल्या धावा करता येतात. त्यामुळे जास्तीत जास्त चेंडू खेळून मधल्या फळीसाठी पाया रचण्याचे काम सलामीवीर करत असतात. पहिल्या कसोटीत शिखर धवन अपयशी ठरला होता. दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावांत मुरली विजयला भोपळाही फोडता आला नाही. लोकेश राहुलच्या बॅटमधूनही धावा निघत नाहीत. त्यामुळे भारताच्या सलामीचा तिढा अजूनही कायम आहे. आता अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजाराला सलामीला आणायचे का, असा सवाल विचारला जात आहे. पण या दोघांपैकी एकाला नक्कीच सलामीला आणता येऊ शकते आणि एकाला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवता येऊ शकते. कारण सध्याच्या घडीला हाच पर्याय भारतापुढे खुला असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर दिनेश कार्तिकही सलामीचा पर्याय ठरू शकतो.

यष्टीरक्षणात बदल : दिनेश कार्तिककडे अनुभव असला तरी त्याच्या कामगिरीतून तो जाणवत नाही. कारण दोन्ही सामन्यांत यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून तो अपयशी ठरला आहे. आता जर त्याला खेळवायचे असेल तर सलामीवीर-यष्टीरक्षक असा प्रयोग करता येऊ शकतो. पण जर त्याला वगळण्याचा विचार सुरु असेल तर लोकेश राहुल किंवा रिषभ पंतकडे ही जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. लोकेशला आतापर्यंत मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे पंतकडे कसोटी सामन्याचा अनुभव नाही. त्यामुळे हा तिढादेखील संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागेल.

मानसीकता बदलायला हवी : यापूर्वीच्या लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे भारतीय फलंदाजांच्या मानसीकतेमध्ये बदल करायला हवा. इंग्लंडच्या खेळपट्टीवर चेंडू चांगले स्विंग होत असले तरी थोडा वेळ थांबून स्थिरस्थावर झाल्यावर धावा होऊ शकतात, हा विश्वास फलंदाजांना देणे गरजेचे आहे. या फलंदाजांमध्ये गुणवत्ता नक्कीच आहे. त्यांची मानसीकता बदलली तर त्यांच्याकडून धावाही होऊ शकतील.

विश्वास दाखवण्याची गरज : गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघात सातत्याने बदल करण्यात आले. कर्णधार विराट कोहली वगळता एकाही खेळाडूला संघात कायम ठेवण्यात आलेले दिसत नाही. चेतेश्वर पुजारासारख्या फलंदाजाला पहिल्या सामन्यात वगळले होते. उपकर्णधार अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील दोन सामन्यांत वगळले होते. रवींद्र जडेजा संघाच्या बाहेर आहेच. राहुल, धवन, कार्तिक, रहाणे, मुरली विजय, यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. या खेळाडूंवर विश्वास दाखवण्याची गरज आहे. एका सामन्यातील वाईट कामगिरीने जर संघात बदल करायचे ठरवले, तर संघात एकवाक्यता राहणार नाही.

गोलंदाजी : नॉटींगहॅमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला मदत करणारी आहे. भारताने या मैदानात जेव्हा सामना जिंकला होता तेव्हा माजी गोलंदाज झहीर खानने 9 बळी मिळवले होते. त्यामुळे त्याचासारखा भेदक मारा भारताच्या वेगवान गोलंदाजांना करावा लागेल. या सामन्यासाठी संघात तीन वेगवान गोलंदाजांना संधी द्यायला हवी. भारतीय संघ यावेळी जसप्रीत बुमरा तंदुरुस्त ठरतो का, याकडे डोळे लावून बसलेला असेल.

जडेजाला संधी :रवींद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगला लौकिक मिळवला आहे. भारताला गेल्या सामन्यात तळाच्या फलंदजांनी मदतीचा हात दिला होता. आर. अश्विनने चांगली फलंदाजी केली होती. पण त्याचा चांगली साथ मिळाली नव्हती. त्यामुळे या सामन्यात जडेजाला संधी दिली तर भारताची फलंदाजी थोडी तगडी होऊ शकेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button