breaking-newsराष्ट्रिय

हुसेनी ब्राह्मण का पाळतात मोहरम? अभिनेता संजय दत्तपर्यंतची रंजक परंपरा

आंतरधर्मीय सौहार्दाचं प्रतीक म्हणून अनेक मुस्लीम गणेशोत्सव साजरा करतात, तर अनेक हिंदू मोहरम पाळतात. या सगळ्यात फारशी कुणाला माहिती नसलेली एक परंपरा आहे, हुसेनी ब्राह्मण या समुदायाची. हे खरेतर मोहयाल ब्राह्मण, परंतु ते स्वत:ला हुसेनी ब्राह्मण म्हणवतात, आणि त्याला कारणही तसंच ऐतिहासिक आणि रंजक आहे. या ब्राह्मण समुदायामध्ये सिनेअभिनेते संजय दत्त व सुनील दत्त यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या झाकिर हुसेन महाविद्यालयात उर्दू साहित्य शिकवणाऱ्या खालिद अलवी यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये लेख लिहून या परंपरेची माहिती दिली आहे. हुसेनी ब्राह्मण केवळ आंतरधर्मीय सौहार्द म्हणून मोहरम पाळत नाहीत, तर या काळात विवाहासारखे धार्मिक विधीही ते करत नाहीत. मोहरमच्या मिरवणुकीत सहभाग घेणं असो किंवा शोक व्यक्त करणं असो, हे हुसेनी ब्राह्मण मोहरममध्ये एकदिलानं सहभागी होतात. या हुसेनी ब्राह्मणांमध्ये सुनील दत्त, काश्मिरी लाल झाकीर, साबिर दत्त, नंद किशोर विक्रम अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तिंचा समावेश आहे. फाळणीच्या आधी हुसेनी ब्राह्मण हे सिंध व लाहोरमध्ये वास्तव्यास होते. फाळणीनंतर ते अलाहाबाद, दिल्ली, पुष्कर व मुंबई-पुण्यामध्ये स्थलांतरित झाले.

हुसेनी ब्राह्मणांमध्ये चालत आलेली कथा अशी आहे की, त्यांचे पूर्वज राहिब दत्त यांनी आपल्या सात मुलांसह नैतिक अशा इमाम हुसेन यांच्या बाजुनं करबलाच्या ऐतिहासिक युद्धात सहभाग घेतला होता. या राहिब दत्तंच्या भोवती अनेक कथा जोडल्या आहेत. असं मानण्यात येतं, की राहिब दत्त हे त्यावेळी लाहोरचे राजा असलेल्या चंद्रगुप्तांच्या दरबारातले मानकरी होते व व्यवसायानं कापडाचे व्यापारी होते. करबलाच्या युद्धाच्यावेळी राहिब दत्त व त्यांच्याबरोबरचा आणखी एक ब्राह्मण इराकमध्ये होते. या युद्धाची वार्ता समजल्यावर हे युद्ध रामायण वा महाभारतासारखं सत्य व असत्य किंवा देववृत्ती व दानववृत्ती यांच्यात असल्याची धारणा राहिब दत्तांची झाली. इमाम हुसेन व याझिद यांच्यात झालेल्या या एकतर्फी लढाईत केवळ तत्व म्हणून चांगल्या बाजुनं म्हणजे इमाम हुसेन यांच्या बाजुनं राबिब दत्त व सात मुलं लढली. राहिब दत्त वाचले परंतु त्यांची सातही मुलं कुर्बान झाली.

लढाईनंतर राहिब दत्त इमाम हुसेन यांच्या कुटुंबियांना भेटले. राहिब दत्त यांच्या वर्तणुकीनं भारावलेल्या हुसेन यांच्या कुटुंबियांनी त्यांना हुसेनी ब्राह्मण म्हणून गौरवले, तेव्हापासून हे पद त्यांना व नंतरच्या समुदायाला चिकटलं. इमाम हुसेन व सात ब्राह्मण भाऊ यांची गळा चिरून हत्या करण्यात आली, त्यामुळे अशीही श्रद्धा बाळगण्यात येते की, हुसेनी ब्राह्मणांच्या गळ्यावर जखमेचा व्रण असतो. शेकडो वर्षे ही परंपरा व कथा चालत राहिली असून, जाती व धर्मविद्वेषाच्या वातावरणात शेकडो वर्षांची परंपरा असलेला असा बंधुभाव अजुनही पाळण्यात येतो हेच विशेष.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button