breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी कट्टरपंथीयांच्या कारवाया!

‘एटीएस’कडून आरोपपत्र दाखल; सनातनसह इतर समविचारी संघटनांमध्ये कट्टरपंथीयांचा सहभाग

नालासोपारासह राज्याच्या विविध जिल्ह्य़ामधून अटक करण्यात आलेले कट्टरपंथीय तरुण सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीसह समविचारी संस्था, संघटनांचे सदस्य आहेत. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी समविचारी तरुणांची दहशतवादी टोळी उभी केली. शस्त्रे-स्फोटकांचा साठा जमवून भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना लक्ष्य केले, तसे प्रयत्न सुरू ठेवले, जाहीर कार्यक्रम उधळून लावण्यासाठी कट आखले, असा आरोप दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) ठेवला.

एटीएसने बुधवारी विशेष सत्र न्यायालयात शरद कळसकर ऊर्फ विष्णू, वैभव राऊत ऊर्फ वामन, सुधन्वा गोंधळेकर, अमोल काळेसह एकूण १२ आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात नालासोपारा, सोलापूर, सातारा येथून हस्तगत करण्यात आलेला २३ जिवंत गावठी बॉम्ब, १५ बंदुकांसह, शस्त्र-बॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, साधने, रसायने असा मुद्देमाल, दोन कार, पाच मोटारसायकल, एका मोटरसायकलचे सुटे भाग, नंबर प्लेट असा मुद्देमाल, आरोपींनी शस्त्रे-स्फोटके तयार करणे आणि ती चालवण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या राज्य, राज्याबाहेरील ठिकाणी केलेला पंचनामा, आरोपींसह साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक तपासातून पुढे आलेले परिस्थितीजन्य पुरावे, आर्थिक स्त्रोत आणि अन्य पुराव्यांची मालिका आरोपपत्रातून न्यायालयासमोर सादर केली आहे.

सनातन संस्थेच्या क्षात्रधर्म साधनेच्या पुस्तिका बहुतांश सर्वच आरोपींकडून हस्तगत केल्या गेल्या. या संपूर्ण तपासातून क्षात्रधर्म साधनेत नमूद केलेल्या हिंदू राष्ट्र निर्मिती हे या आरोपींचे उद्दिष्ट होते आणि त्या दृष्टीने त्यांनी कारवाया केल्या, अशी माहिती एटीएसने आरोपपत्रात नमूद केली आहे. भिन्न विचारसरणीच्या विचारवंत, प्रतिष्ठित व्यक्तींच्या हत्या घडविण्याचा कट या टोळीने आखला होता.

कट अमलात आणण्यासाठी टोळीकडून घडलेल्या हालचाली आरोपपत्रात नमूद आहेत. याशिवाय बेळगाव, कल्याण येथील चित्रपट गृहांमधील स्फोट आणि पुण्यात आयोजित सनबर्न समारोहादरम्यान घातपात घडविण्याचा कट याबाबतही आरोपपत्रात सविस्तर तपशील नमूद आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक एमएम कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या याच टोळीने घडवून आणल्या. हे हत्यासत्र पुढे सुरू ठेवण्यासाठी टोळीने लक्ष्य निवडली, त्यांच्यावर पाळत ठेवली, कार्यक्रम उधळून लावण्यासाठी कट आखले, शस्त्रसाठा गोळा केला, प्रशिक्षण घेतले आणि या सर्व कारवायांसाठी अर्थसहाय्य उभे केले असा संशय एटीएससह विविध तपास यंत्रणांना आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button