breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘हायपरलूप’च्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे, कंपनीचं पथक लवकरच पुण्यात

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली. कंपनीचे एक पथक लवकरच यासाठी पुण्याला येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचं शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात या पथकाने नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाच्या चाचणी केंद्राला भेट दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉईड यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील संपूर्ण माहिती दिली.

मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाची व्यावहारिक उपयोगिता पडताळण्यासाठी नुकताच एक अभ्यासही करण्यात आला. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक आणि अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फ्रेमवर्क कराराची घोषणाही केली होती.

व्हर्जिन हायपरलूप लवकरच आपल्या अभियंत्यांचे पथक पुण्याला पाठवणार आहे. या प्रकल्पासाठी पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक) निश्चित केला आहे. मुंबई-पुणे अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणाऱ्या या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी 70 टक्के सामुग्री आणि उपकरण हे महाराष्ट्रातच उपलब्ध होऊ शकणार आहे. या 100 टक्के इलेक्ट्रीक आणि कार्यक्षम प्रणालीमुळे दीड लाख टन कार्बनचं उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार असून वेळेची बचत, पर्यावरण रक्षण, अपघातांच्या संख्येत घट, वाहतूक कोंडीतून सुटका असे अनेक सामाजिक आणि आर्थिक फायदेसुद्धा होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button