breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

हाफिज सईदच्या अटकेचे पाकिस्तानकडून नाटक-शिवसेना

पाकिस्तान सरकारने हाफिज सईदच्या अटकेचे नाटक केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पाकिस्तान सरकारने बुधवारी हाफिज सईदला अटक केली. हाफिज सईद हा मुंबईवरच्या २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. ही अटक झाल्याची बातमी बुधवारीच आली. मात्र ही अटक की अटकेचे नाटक आहे असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानावर निशाणा साधण्यात आला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
मुंबईवरील ‘26/11’ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अर्थात ही खरी अटक आहे की अटकेचे ‘नाटक’ आहे हे पाकिस्तान आणि त्या हाफिजलाच माहीत. मागील काही काळापासून हिंदुस्थानने हाफिज सईदसंदर्भात जागतिक पातळीवरून पाकिस्तानवर दबाव निर्माण केला होता. हाफिज याला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठीही प्रचंड प्रयत्न केले होते. अमेरिका, इंग्लंडसह सर्व बडय़ा देशांनीही त्याला समर्थन दिले होते. मात्र नेहमीप्रमाणे चिनी माकडांचेच मांजर आडवे गेले होते. पाकिस्तानात सत्ताधारी अथवा लष्करशहा कोणीही असला तरी हाफिज सईद, त्याच्या दहशतवादी संघटना आणि त्यामार्फत हिंदुस्थानवर होणारे जिहादी हल्ले याबाबतीत पाकिस्तानचे धोरण हाफिजच्या पारडय़ात वजन टाकणारेच राहिले आहे. कारण हाफिज सईदचा बोलविता धनी आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. कोणत्याही पाकडय़ा पंतप्रधानाने हाफिजवर कडक कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत केलेले नाही. तेव्हा विद्यमान पंतप्रधान इम्रान ते दाखवून आधीच गोत्यात असलेला आपला पाय आणखी खोलात घालतील याची शक्यता नाही. यापूर्वीही हाफिजला स्थानबद्ध केल्याचे नाटक पाकड्यांनी केले होतेच, पण दोन्ही वेळेस त्याची मुक्तता करण्यात आली. किंबहुना, या स्थानबद्धतेच्या काळात त्याची ज्या पद्धतीने बडदास्त ठेवण्यात आली त्यावरूनही पाकिस्तानचे नाटक स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता त्याला पुन्हा अटक झाली म्हणजे तो त्याच्या दहशतवादी संघटना आणि कारवाया संपल्या असे होणार नाही.

मनीलॉण्डरिंग आणि दहशतवादी कारवायांना रसद पुरविल्याप्रकरणी जो गुन्हा दाखल आहे त्यासंदर्भात झाली आहे. त्यामागे ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ या जागतिक संघटनेचा दबाव कारणीभूत आहे. शिवाय आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेला पाकिस्तान सध्या देशोदेशी कटोरा पसरून भीक मागत फिरत आहे आणि दहशतवादाचा पोशिंदा ही त्या देशाची प्रतिमा त्याआड येत आहे. दुसरीकडे त्यावरूनच ‘फायनान्शियल टास्क फोर्स’कडून ‘काळय़ा यादी’त टाकले जाण्याची भीतीही पाकिस्तानला सतावते आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर हाफिज सईदच्या अटकेचा बनाव घडवून आणला गेला आहे का? दहशतवादाविरोधात आपण कारवाई करीत आहोत यासाठी या अटकेची धूळफेक केली गेली आहे का? पाकिस्तान सरकारने हाफिजला अटक करायची आणि नंतर न्यायालयाने त्याला जामिनावर मोकळे करायचे या नाटकाचे ‘यशस्वी’ प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button