breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

स्मार्टकार्ड ताईत, अपंगांची मोटारसायकल, बायोगॅसवर शीतगृह आणि बरंच काही..

अभिकल्प प्रदर्शनाचा आज अखेरचा दिवस

कुपोषित बालकांच्या वजनाची अचूक नोंद ठेवणारा ‘खुशी बेबी’ हा स्मार्टकार्ड असलेला ताईत, पाण्याचा थेंबही न वापरता स्वच्छ राहणाऱ्या मुताऱ्या, अपंगांच्या चाकाच्या खुर्चीला जोडता येईल अशी मोटारसायकलसारखी ‘अटॅचमेंट’.. सौर ऊर्जेवर चालणारे हॉवरक्राफ्ट, बायोगॅस आणि शेतीमधला सेंद्रिय कचरा वापरून बनविलेल्या ऊर्जेवर चालणारे शीतगृह.. रेल्वे रुळांवर दोन किलोमीटर दूपर्यंतच्या अडथळय़ांची पूर्वसूचना मोटरमनला देणारे लेझर- ब्लूटुथ संवेदक, मजुरांना पाठीच्या मणक्याचे दुखणे जडू नये यासाठी वापरण्याचा ‘जयपूर बेल्ट’, महिलांमधील मूत्रमार्ग-संसर्ग नेमक्या कोणत्या कारणामुळे आहे हे ओळखण्यासाठी एकाच वेळी चार चाचण्या करू शकणारे साधेसे उपकरण..

.. या आणि अशा शंभरेक नवनवीन कल्पना सध्या राणीबागेमधील मुंबई महापालिकेच्या ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’मध्ये सर्वाना पाहण्यासाठी खुल्या आहेत! मात्र रविवारी या प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे.

हे प्रदर्शन आहे ‘अभिकल्प स्पर्धे’तल्या चमकदार कल्पनांचे. शेती, पर्यावरण, आरोग्य, वाहतूक, स्वच्छता व पाणीपुरवठा, विकलांगांचे  आयुष्य सुकर करणे, अशा लोकोपयोगी क्षेत्रांमधील भारताच्या गरजांनुसार योजकपणे वस्तू वा उपकरणे घडवण्याच्या या स्पर्धेसाठी तब्बल ९९३ जण हिरिरीने उतरले होते..  त्यांपैकी निवडक शंभरेक संकल्पनांचे हे प्रदर्शन असल्यामुळे, समाजाबद्दल ज्यांना-ज्यांना आस्था आहे आणि नव्या कल्पनांचे कौतुक ज्यांना करता येते, त्या सर्वासाठी हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात वस्तू नाहीत; पण वस्तूंच्या डिझाइनची – अभिकल्पांची सचित्र माहिती इथे आहे. या स्पर्धेच्या आठ विभागांतील प्रत्येकी एका विजेत्याच्या कामाची माहिती देणाऱ्या चित्रफिती इथे पाहता येतात आणि अनेक वस्तूंची प्रतिरूपे म्हणजे मॉडेल्सही मांडलेली आहेत. टाटा ट्रस्ट आणि टायटन यांनी भारतीय गरजांसाठी अभिकल्पांची ही स्पर्धा घेतली होती. त्यापैकी विजेत्यांना, रु. ६५ लाखांपर्यंतची रक्कम त्यांनी योजलेली वस्तू प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत म्हणून मिळाली. मात्र जे विजेते ठरले नाहीत, त्यांच्याही कल्पना लोकांपर्यंत जाव्यात,  यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले. गावोगावी मांडले जाऊ  शकेल, अशा सुटसुटीत रचनेच्या या प्रदर्शनात इंग्रजीतून भरपूर माहिती देणारे फलक आहेत. जिज्ञासेने पाहिले, तर तासभर लागेल इतके हे मोठे प्रदर्शन आहे. अर्थात, ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’चे दहा रुपयांचे तिकीट काढल्यास हे प्रदर्शन आणि सोबतचे संग्रहालय पाहण्यात तीन-चार तास सहज सत्कारणी लागतात!

विजेत्यांनी, तसेच अन्य अनेक कल्पकांनी आपापल्या अभिकल्पांच्या ‘पेटंट’चे अर्ज केलेले आहेत. विशेष म्हणजे, ‘टाटा ट्रस्ट’ने यापैकी एकाही विजेत्याच्या कल्पनेवर आपला हक्क न सांगता, केवळ देशकेंद्री अभिकल्पकांना प्रोत्साहन म्हणून ही स्पर्धा घेतली. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी ‘डिझाइन इम्पॅक्ट अवॉर्ड्स (डॉट) इन’ या संकेतस्थळाला भेट देता येईल.

‘कट्टय़ा’वर आज कुलकर्णी

याच भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या ‘शैक्षणिक सभागृहा’त रविवारी सायंकाळी पाच वाजता, ख्यातनाम अभिनेते आणि मूळचे चित्रकार संदीप कुलकर्णी यांच्याशी गप्पांचा ‘म्युझियम कट्टा’ हा उपक्रम होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button