स्थायी समिती : भाजपच्या चार, अपक्ष एका नगरसवेकाचा राजीनामा
– महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिले पत्र
– ‘सर्वांना संधी’च्या मॉडेलचे अनुकरण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या भाजपच्या चार सदस्यांनी तसेच अपक्ष आघाडीतील एका नगरसेवकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापौर नितीन काळजे यांच्याकडे शुक्रवारी संबंधितांनी राजीनामे सुपूर्त केले आहेत. नगरसेवक लक्ष्मण उंडे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, उत्तम केंदळे यांचा समावेश आहे. तसेच, अपक्ष आघाडीचे नगरसेवक कैलास बारणे यांनीही स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. सत्ताधारी भाजपमधील सर्व नगरसेवकांसह पाठिंबा दिलेल्या अपक्ष आघाडीत नगरसेवकांना महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवर समान संधी उपलब्ध करुन देण्याचे ‘मॉडेल’ भाजप श्रेष्ठींनी केले आहे. त्यानुसार प्रत्येक नगरसेवकाला एक वर्ष महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेतील सत्तेच्या पहिल्या वर्षांत स्थायी समितीवर १० भाजप आणि १ अपक्ष असे एकूण ११ सदस्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी संधी दिली होती. एक वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर संबंधित नगरसेवकांचे राजीनामे घेतले जाणार, अशी चर्चा होती.