breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सोलापूर विद्यापीठाचा 31 मे रोजी नामविस्तार

  • विमानतळ व रेल्वे रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा केंद्राला प्रस्ताव पाठवणार 

मुंबई – सोलापूर विद्यापीठाचा “पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 31 मे रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. सोलापूर विमानतळास महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याचा निर्णय आणि सोलापूर रेल्वे स्टेशनला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठविणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

मंत्रालयात शनिवारी शिवा संघटनेच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधीसमवेत समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस धनगर समाज विकास परिषदेचे अध्यक्ष गणेश हाके, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, यशवंत उद्योजकचे अध्यक्ष ललित बंडगर, शिवा महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली लाठे, शिवा संघटनेचे अध्यक्ष शिवा बिराजदार आदिसह समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सामंजस्याने समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्याने तावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. तसेच, सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकाची घोषणा झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याअध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल.

याचबरोबर वीरशैव लिंगायत समाजातील तरूण-तरूणींना उद्योग सुरू करण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळास दरवर्षी 10 कोटी रूपये देणे. अभ्यासक्रमामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या माहितीचा समावेश करणे, विविध विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे जेणेकरून तेथे महात्मा बसवेश्वर यांची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात येतील. महात्मा बसवेश्वर जयंतीला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार व्यक्ती व संस्था यांना विशेष कार्यासाठी देण्यात यावा. असे निर्णय घेण्यात आले असल्याची माहितीही तावडे यांनी दिली. महाराष्ट्र वीरशैव- लिंगायत बोर्ड कायद्याने स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button