breaking-newsपुणेमहाराष्ट्र

सायकल योजनेला पुन्हा गती

पुणे महापालिकेसमोर संख्या वाढविण्याचा प्रस्ताव; सायकल मार्ग प्रगतिपथावर

महापालिकेकडून राबवल्या जात असलेल्या भाडे तत्त्वावरील सायकल योजनेतील सायकलची होत असलेली मोडतोड, सायकलींचा गैरवापर आणि शुल्क वाढविल्यामुळे वापरकर्त्यांनी फिरविलेली पाठ या कारणांमुळे या योजनेसाठी सायकल उपलब्ध करून दिलेल्या प्रमुख कंपन्यांनी योजनेतून माघार घेतली होती. परिणामी शहरातील सायकलींची संख्याही घटली होती. मात्र दोन कंपन्यांनी सायकल उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून तसा प्रस्ताव महापालिकेपुढे ठेवण्यात आल्यामुळे सायकल योजनेला पुन्हा गती मिळणार आहे.

शहरातील खासगी वाहनांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एकात्मिक सायकल योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने महापालिकेची ही योजना प्रथम प्रायोगिक तत्त्वावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि औंध भागात सुरू करण्यात आली. योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रारंभी झूमकार, पेडल, मोबाईक, ओफो आदी कंपन्यांनी या योजनेला प्रतिसाद देऊन हजारोंच्या संख्येत सायकल उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे टप्प्याटप्प्याने भाडे तत्त्वावरील सायकल योजनेचा विस्तार करून शहरातील प्रमुख रस्त्यांवर सेवा सुरू करण्यात आली.

मात्र या सायकलींचा गैरवापर होत असल्याचे प्रकार पुढे आले. सायकलींची मोडतोड करणे, सायकलला बसविण्यात आलेली जीपीआरएस यंत्रणा काढूणे, सायकली नदीपात्रात फेकून देणे असे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडले. सायकल नादुरुस्त होत असल्यामुळे ओफो आणि पेडल या कंपन्यांनी बिघाडाचे कारण देत चार हजार सायकली परत घेतल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र सहज दिसणाऱ्या सायकलींची संख्या घटून त्याला प्रतिसाद मिळणेही कमी झाले होते.

भाडे तत्त्वावरील सायकल योजनेअंतर्गत महापालिकेने अनेक कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केले होते. सायकल वापराचे शुल्क कंपन्यांना उत्पन्न म्हणून मिळणार होते. त्यामुळे कंपन्यांकडूनही प्रतिसाद मिळत होता. मात्र सायकलींची दुरवस्था होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे कंपन्यांनी नाइलाजास्तव योजनेतून माघार घेतली.

सायकलची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर योजनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे योजनेला गती देण्यासाठी महापालिकेकडून कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. त्याला प्रतिसाद देत दोन कंपन्यांनी पुन्हा या योजनेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. पेडल कंपनीने चार हजार सायकल तर ओफो कंपनीने एक हजार सायकल उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनापुढे ठेवला आहे. सध्या मोबाईक या कंपनीच्या तीन हजार सायकल आणि अन्य एका कंपनीच्या तीन हजार अशा सहा हजार सायकल शहराच्या विविध भागात असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

सायकल मार्ग प्रस्तावित

शहरात एकात्मिक सायकल आराखडा योजनेनुसार एकूण ८२४ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग प्रस्तावित आहेत. त्यापैकी पथ विभागामार्फत सुमारे २६ किलोमीटरचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. तर २८ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग प्रगतिपथावर आहेत.

उत्पन्न कंपन्यांना

भाडे तत्त्वावरील सायकल योजनेसाठी महापालिकेने कोणताही खर्च केलेला नाही. योजनेत सहभागी कंपन्यांनी सायकल स्वखर्चाने भाडे तत्त्वावर उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीची असून उत्पन्नही कंपनीला मिळेल.

या ठिकाणी सेवा

सायकलचा वापर, नागरिकांची मागणी यानुसार जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन महाविद्यालय रस्ता,  एमआयटी, शिवाजीनगर, कोथरूड, विधी महाविद्यालय रस्ता, सिंहगड रस्ता, नांदेड सिटी, कर्वेनगर, बी. टी. कवडे रस्ता, अ‍ॅमनोरा पार्क, औंध आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात ही सेवा सुरु करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button