breaking-newsआरोग्य

सांभाळून रहा ब्रेन स्ट्रोकपासून

डॉ. शिरीष हस्तक

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?

मेंदूला पुरेशा ऑक्‍सिजनचा पुरवठा न मिळाल्यामुळे मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणं आवश्‍यक आहे. याबाबत बहुसंख्य लोकांना माहिती नसते. चार तासांच्या आत विशिष्ट गुठळी कमी करण्याकरिता उपाय केले गेले नाहीत तर मृत्यू ओढवू शकतो.

छातीत धडधडणं ही गोष्ट वरकरणी साधी वाटली तरीही प्रत्येकवेळी याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्याचबरोबर धाप किंवा अस्वस्थता वाटत असेल तर ही कदाचित ब्रेन स्ट्रोकच्या ऍटॅकची लक्षणंही असू शकतात. आर. आर. या 49 वर्षीय गृहिणीला जाणवले की, त्यांच्या छातीत वारंवार धडधड होत आहे. त्यामुळे त्यांना कधीकधी धापही लागते आणि अस्वस्थ वाटू लागते. या संदर्भात विचारणा करण्यासाठी त्या त्यांच्या पतीसोबत त्यांच्या फॅमिली डॉक्‍टरकडे गेल्या. डॉक्‍टरने त्यांना ईसीजी काढायला सांगितला.

ईसीजीमध्ये त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित असल्याचे दिसून आले. त्याला वैद्यकीय भाषेत एट्रिअल फिब्रिलेशन म्हणतात. त्यांना त्यांच्या डॉक्‍टरांनी लगेचच रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले, जेणेकरून याचे निदान करता येईल. त्याचप्रमाणे रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी त्यांना रक्त पातळ करणा-या गोळ्या सुरू करण्यास सांगण्यात आले. दुर्दैवाने त्यांनी त्यावेळी सल्ला ऐकला नाही आणि त्या घरी गेल्या.

पाच दिवसांनंतर जेव्हा दुपारी त्या चहा करत होत्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांना उजवा हात उचलता येत नाहीये आणि त्या चहाचा कपही नीट धरू शकत नाहीयेत आणि त्यांनी मदतीसाठी कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या बोलूही शकत नव्हत्या. त्यांच्या पतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग केल्यावर समजले की, त्यांच्या मेंदूमध्ये गुठळ्या झाल्या आहेत.

या गुठळ्या त्यांच्या हृदयाकडून मेंदूपर्यंत पोहोचल्या आहेत. ही गुठळी विरघळवण्यासाठी त्यांना अत्यंत पॉवरफूल इंजक्‍शन (टीपीए) घेण्यास सांगण्यात आले, जे स्ट्रोक आल्यावर पहिल्या साडेचार तासांमध्ये द्यायचे असते. त्यांना ते इंजेक्‍शन देण्यात आले आणि तासाभरात त्यांना थोडे थोडे बोलता येऊ लागले आणि 24 तासांनी त्यांना हातापायाची हालचाल करता येऊ लागली.

हृदयाचे ठोके अनियमित असतील आणि त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर गुठळ्या तयार होऊ शकतात. या गुठळ्या त्यानंतर मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो आणि हृदय बंद पडू शकते. ही समस्या जगभरात आढळून येते आणि दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढतच चालले आहे. या संदर्भात 2010 साली लोकसंख्येवर आधारित करण्यात आलेल्या पाहणीत तीन कोटी 35 लाख व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके अनियमित असल्याचे आढळून आले आणि यात दरवर्षी सुमारे 50 लाख व्यक्तींची भर पडत आहे. ही काळजी करण्यासारखी बाब आहे. कारण यामुळे हृदयात गुठळ्या तयार होऊन त्या शरीरातील इतर अवयवांपर्यंत, विशेषत: मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका असतो.

उपचारांनंतर आरआर यांना घरी पाठविण्यात आले. त्यांना एट्रिअल फिब्रिलेशनची समस्या असलेल्या व्यक्तींना देण्यात येणा-या रक्त पातळ करणा-या खास गोळ्या घेण्यास सांगण्यात आले. आज आरआर सामान्य आयुष्य जगत आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार त्या घर सांभाळत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button