breaking-newsक्रिडा

सांघिक कामगिरी हेच मुंबईच्या यशाचे गमक!

चौथ्यांदा ‘आयपीएल’च्या चषकावर नाव कोरणाऱ्या रोहित शर्माचे मत

संपूर्ण स्पर्धेदरम्यान आमचा संघ एखाद-दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून राहिला नाही. गरजेच्या वेळेस वेगवेगळ्या खेळाडूंनी पुढाकार घेत संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे सांघिक कामगिरीतच मुंबईच्या यशाचे रहस्य लपले आहे, अशा शब्दांत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने विजेतेपदानंतर आपल्या भावना प्रकट केल्या.

रोहितच्या नेतृत्वाखील मुंबईने रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या विजेतेपदाला चौथ्यांदा गवसणी घातली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला अवघ्या एका धावेने पराभूत केले. या विजेतेपदाविषयी रोहित म्हणाला, ‘‘हंगामाच्या सुरुवातीलाच आम्ही स्पर्धेचे दोन गटात विभाजन केले. यामुळे कोणत्या क्षणी खेळ उंचावायचा याची आम्हाला जाणीव झाली. आमच्या चमूत तब्बल २५ खेळाडूंचा समावेश होता. परंतु विजयासाठी आम्ही एका-दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून कधीच नव्हतो. मोक्याच्या क्षणी विविध खेळाडूंनी पुढाकार घेत आपापली भूमिका बजावली. सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीमुळेच आम्ही विजेतेपद मिळवू शकलो.’’

‘‘आमच्या गोलंदाजांनी विशेषत: कौतुकास्पद कामगिरी केली. लसिथ मलिंगा हा सवरेत्कृष्ट गोलंदाज आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा दडपणाच्या परिस्थितीत संघाला विजयाची दिशा दाखवली आहे. अंतिम षटक हार्दिक पंडय़ाला द्यावे असा विचार माझ्या मनात डोकावला होता, परंतु या कठीण अवस्थेतून यापूर्वीही गेलेल्या खेळाडूकडेच मला चेंडू सोपवायचा होता. त्यामुळे मी मलिंगाला अखेरच्या षटकासाठी पाचारण केले,’’ असे रोहितने अंतिम षटकापूर्वी मनात घोळत असलेल्या विचारांबद्दल विचारले असता सांगितले.

रोहितचे कर्णधार म्हणून हे चौथे विजेतेपद असले तरी खेळाडू म्हणून पाच विजेतेपद मिळवणारा तो पहिलाच ठरला आहे. २००९ मध्ये त्याने डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना विजेतेपद मिळवले होते. या पाचही विजेतेपदांपैकी कोणत्या विजेतेपदामुळे अधिक आनंद झाला असे विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘खरे तर मला डेक्कन चार्जर्स संघासोबत असताना मिळवलेल्या विजेतेपदाचा विसरच पडला होता. प्रत्येक विजेतेपद हे माझ्यासाठी खास आहे. त्यामुळे मी कोणत्याही एका विजेतेपदाची निवड करू इच्छित नाही. पाचही विजेतेपदांच्या आठवणी माझ्या हृदयात कायमस्वरूपी राहतील.’’ त्याशिवाय संघसहकाऱ्यांची साथ न मिळाल्यास एक यशस्वी कर्णधार कधीच घडू शकत नाही. त्यामुळे माझ्या संघातील प्रत्येक खेळाडूचे, साहाय्यक प्रशिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो, असेही रोहितने नमूद केले.

..म्हणूनच मलिंगाला ‘स्लोअर-यॉर्कर’ टाकण्यास सांगितले!

शार्दूल ठाकूरच्या फलंदाजीची मला पूर्ण कल्पना असल्यामुळेच मलिंगाला अखेरचा चेंडू ‘स्लोअर-यॉर्कर’ टाकण्याचा सल्ला दिला, असे रोहितने सांगितले. ‘‘शार्दूल व मी मुंबईच्या स्थानिक स्पर्धामध्ये बऱ्याचदा एकत्र खेळलो आहोत. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर तो कोणत्या दिशेला बॅट भिरकावेल, याची मला पुसटशी कल्पना होती. त्यामुळे मी लेग-साइडला फक्त दोन क्षेत्ररक्षक लावून त्याला त्या दिशेने चेंडू फटकावण्यासाठी उत्साहित केले. त्यानंतर मलिंगासह चर्चा करून आम्ही दोघांनीही ‘स्लोअर-यॉर्कर’ चेंडू टाकण्याचे ठरवले. अनुभवी मलिंगानेसुद्धा सुरेख ‘स्लोअर-यॉर्कर’ टाकून शार्दूलला पायचीत पकडले आणि आमची योजना यशस्वी ठरली,’’ अशा शब्दांत रोहितने अखेरच्या चेंडूमागील रहस्य उलगडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button