breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सहकारमंत्र्यांचे चिरंजीव रोहन देशमुखांची नऊ तास चौकशी

सोलापूर – दूधभुकटी प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून 5 कोटींचे अनुदान लाटल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलासह नऊ आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेत हजर होण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करण्यासाठी मंत्रिपुत्र रोहन देशमुखसह आठ आरोपींची आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्‍यांनी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली. 

एक संशयित आरोपी प्रकाश लातुरे हा आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाला नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यापूर्वी  3 डिसेंबर रोजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलासह पाच जणांनी पोलिस आयुक्‍तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत येऊन आपले म्हणणे मांडत जबाब नोंदवले होते. शासनाची 5 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद दुग्धविकास अधिकारी पांडुरंग दादू येडगे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात 28 नोव्हेंबर रोजी दाखल केली होती. फसवणुकीची रक्‍कम मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग  करण्यात आला  होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 डिसेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोकमंगलच्या बीबी दारफळ येथील दूधभुकटी प्रकल्पाला भेट दिली होती. याठिकाणी 3 मेट्रिक टनाचा दूधभुकटी कारखाना होता.त्याची क्षमता वाढवून 10 मेट्रिक टनाचा प्रकल्प प्रस्तावित होता. यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली असल्याची फिर्याद सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून सहकार मंत्रीपुत्र रोहन  देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, प्रकाश वैजीनाथ लातुरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर  बादशाह  शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले व भीमाशंकर सिद्राल नरसगोंडे यांच्याविरुध्द भादंवि 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना सोमवारी तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहून  कागदपत्रे सादर करा, अशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सादर करण्यात आलेली कागदपत्रे व  जबाब  यांची पडताळणी करण्यात येईल व त्यानुसार कारवाई होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button