breaking-newsराष्ट्रिय

सर्वोच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार…

  • येडियुरप्पा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री; कॉंग्रेस-जदचे धरणे

  • न्यायालयाने भाजपकडून पाठिंब्याचे पत्र मागवले

बंगळूरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यानंतर व येडियुरप्पा यांच्या शपथविधी सोहळ्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कर्नाटकी नाटकावर अखेर आज तात्पूरता पडदा पडला.

भारतीय जनता पार्टीचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी आज तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येथे सकाळी झालेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. इश्‍वर आणि शेतकऱ्यांना साक्षी मानत त्यांनी शपथ घेतली. त्यांच्या सोबत अन्य कोणाही आमदाराला आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली नाही. पक्षाला स्पष्ट बहुमत नसतानाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची येडियुरप्पा यांची ही दुसरी वेळ आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा मात्र या वादग्रस्त सोहळ्यापासून लांबच राहीले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व अनंत कुमार हेच केवळ यावेळी उपस्थित होते. दरम्यान, आपण दोन दिवसांत विश्‍वासदर्शक ठराव 100 टक्के जिंकू आणि आपण पंधरा दिवस वाट पाहणार नसल्याचा असा विश्‍वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र या पक्षाला सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी कॉंग्रेसने माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. देवेगौडा यांचे पुत्र एच. डि. कुमारस्वामी यांची जनता दलाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यावर त्यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला होता. आपल्याला 117 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र त्यांनी राज्यपालांकडे सोपवले होते. मात्र राज्यपालांनी सगळ्यांत मोठ्या पक्षाचे नेते म्हणून येडियुरप्पा यांनाच सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी मोठ्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देण्याची औपचारिकता बुधवारी रात्री पूर्ण केली. त्यानुसार आज सकाळी हा शपथविधी संपन्न झाला. राज्यपालांच्या या निर्णयाला कॉंग्रेस आणि संयुक्त जनता दलाने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांची याचिक दाखल करून घेतल्यानंतर काल मध्यरात्रीनंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री नंतर कोणत्या याचिकेवर सुनावणी घेण्याची न्यायालयाच्या इतिहासातील कालची दुसरी वेळ होती. यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकुब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेच्या संदर्भातील याचिकेवर मध्यरात्री सुनावणी झाली होती.

कॉंग्रेसच्या याचिकेवर काल रात्री सुनावणी झाल्यावर येडियुरप्पा यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने रात्री नकार दिला. रात्री 2 वाजून 10 मिनीटांनी सुरू झालेल्या सुनावणीवर न्यायालयाने पहाटे चारच्या सुमारास हा निर्णय दिला. आता या प्रकरणी उद्या सुनावणी होणार असून सरकार स्थापनेचा दावा करताना आमदारांच्या पाठिंब्याचे जे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले होते, ते सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

कॉंग्रेस- जनता दलाची निदर्शने 
येडियुरप्पांचा शपथविधी सोहळा सुरू असताना कॉंग्रेस आणि जनता दलाच्या आमदारांनी विधीमंडळाच्या प्रांगणातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायाशी बसून निषेध व्यक्त केला. राज्यपालांची कृती घटनाबाह्य आणि लोकशाही विरोधी आहे. राज्यपाल उघड उघड घोडेबाजाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केला. आम्ही न्यायालयात गेलो आहोत. आता जनतेकडे जाउ. भाजपचा संसदीय लोकशाही आणि घटनेवर विश्‍वास नसल्याचे त्यांना सांगू असेही ते म्हणाले. कुमारस्वामी यांनीही यावेळी पंतप्रधानांवर टीका केली व बहुमत सिध्द करण्यासाठी पंधरा दिवस देण्याचा प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचा दावा केला. आपल्यावर दबाव आणण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा वापर केला जात असल्याचेही ते म्हणाले.

कर्नाटकात सरकार स्थापन करण्याची भाजपची मागणी तर्काधिष्ठीत नाही. राज्यात लोकशाहीची थट्टा केली जात आहे. भाजपकडे बहुमत नसल्याचे स्पष्टच आहे. मात्र तरीही ते आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. तर उर्वरीत देश लोकशाहीच्या पराभवाच्या दु:खात आहे.
राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष

कॉंग्रेसने जनता दलाला पाठिंबा देत संधीसाधु युती केली तेव्हाच देशात लोकशाहीची हत्या झाली होती. हे सगळे कर्नाटकच्या भल्यासाठी नाही, तर स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी करण्यात आले व ते लाजीरवाणे आहे. 104 जागा असणाऱ्या भाजपला बहुमत मिळाले आहे. तर कॉंग्रेसची घसरण होत तो पक्ष 78 पर्यंत खाली आहे.
अमित शहा, भाजप अध्यक्ष

मोदी सरकारने केंद्राकडे असलेल्या अधिकारांचा दुरूपयोग केला आहे. आमदारांना धमकावले जात असल्याची आपल्याला कल्पना आहे. माझे वडील देवेगौडा यांनी पुढे यावे व सर्व प्रादेशिक पक्षाशी चर्चा करावी, असे आवाहन मी त्यांना करतो. लोकशाहीची हत्या केली जात असून आज आम्ही सगळे त्या विरोधात एकत्र उभे आहोत.
कुमारस्वामी, जनता दलाचे नेते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button