breaking-newsताज्या घडामोडीपुणेराष्ट्रिय

सर्वसामान्यांना निवडणूक निकालांबद्दल काय वाटतं? काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया

निवडणुकांमध्ये आपल्या रोजच्या जीवनात फारसा काही बदल घडणार नाही असे जवळजवळ सगळेच म्हणाले, पण तरीही देश प्रगती करेल असा भाजप समर्थकांना जितका विश्वास आहे तितकीच देश विनाशाकडे वाटचाल करत आहे अशी भीती भाजप विरोधकांना वाटते.

२०१९ लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर द वायर मराठी’ टीमने काही सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून निकालाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया –

१.

स्वारगेटच्या जवळच्या एका वस्तीत राहणाऱ्या आणि जवळपासच्या सोसायट्यांमध्ये घरकाम करून कुटुंब चालवणाऱ्या मंदाबाईंबरोबरचा संवाद –

“पाहिला का निकाल निवडणुकीचा?”

“पाहिला ना! कमळ आलं नं?”

“हो. तुम्हाला काय वाटतंय कमळ आलं त्याच्याबद्दल?”

“आमच्या इथं सगळ्यांना कमळच येणार असं वाटतच होतं. आमच्या इथं फक्त कमळच दिसतं सगळीकडे. आधी घड्याळाची लोकं होती, ती पण आता कमळाच्याच बाजूची आहेत. बाकी कोणी दिसतच नाही कधी.”

“तुम्ही कुणाला मत दिलं?”

“कमळालाच की.”

“मग आता पुढच्या पाच वर्षात काय काय होईल असं वाटतंय?”

“बघायचं आता काय काय होतं! आमच्या बँकेतल्या पैशांवर टॅक्स-फिक्स लावून किती पैसे कापून घेतात काय माहीत! अन् गॅस न पेट्रोल पण किती महाग होतंय आता बघायचं”

“मग तरी का बरं कमळाला मत दिलं?”

“ती माणसं सांगत होती मोदी घर देणार आहे, म्हणून मग दिलं मत!”

“ती माणसं म्हणजे कोण?”

“वस्तीत आहेत ना लोक, रेशन कार्डाचं, ह्याचं त्याचं काम असेल तर करून देतात ना.”

“बरं पण कमळाला मत दिलं म्हणजे कुणाला मत दिलं?”

“कुणाला म्हंजे? मोदीला!”

“अहो असं नसतं. पुण्यातून किंवा बाकी गावांमधून निवडून जाणारे वेगळे लोक असतात. मग ते मोदीला निवडून देतात.”

“मी काय एवढं नाव-बिव पाहिलं नाही. कमळाचं चिन्ह दिसलं की दाबलं बटण. तुम्हीच सांगा की पुण्यातून कोण गेलं निवडून.”

“पुण्यातून गिरीश बापट निवडून आलेत. ऐकलंय का नाव?”

“वाटतंय जरा जरा ऐकल्यासारखं.”

“म्हणजे तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांचं नाव पण माहीत नाही तुम्हाला?”

“त्याचं नाव कशाला माहीत पाहिजे? शेवटी तर मोदीच असणार नं?”

२.

शैलेश हे हडपसरमधील एका मध्यम उद्योगामध्ये कर्मचारी आहेत.

“या निवडणुकीत मोदी पुन्हा निवडून आलेत. काय वाटतं त्याबद्दल?”

“वाटलं नव्हतं एवढी मतं मिळतील. मागच्या वेळपेक्षा कमी सीट्स मिळतील असं वाटलं होतं. आमच्या भागात (शिरूर मतदारसंघ) मात्र आम्ही बीजेपीची हवा होऊ दिली नाही. आणि आमच्या शेजारी सुद्धा सुप्रियाताई आल्या. अमोल कोल्हेने खूप कष्ट घेतले. रात्री १०-१० वाजेपर्यंत प्रचार करत फिरत होता.

वंचित बहुजन बरोबर आघाडी केली असती तर महाराष्ट्रात उपयोग झाला असता. आता विधानसभेला तरी तसं करावं.

“मागच्या पाच वर्षांमध्ये सरकारने केलेल्या कामाचे फळ त्यांना मिळाले असे वाटते का?”

“खरं तर मागची पाच वर्षं अच्छे दिनची वाट बघण्यातच गेलेत. उद्योगांसाठी मागच्या पाच वर्षात सरकारने काहीच केलेले नाही. छोट्या व्यावसायिकांसाठी तर काहीच नाही. फक्त मोठ्या बिझिनेससाठीच सगळी धोरणं राबवली. छोटे मरत आहेत. मोठे आणखी मोठे होत आहेत.

यांचं सरकार आल्यापासून यांनी थेट उत्पादकांना ऑर्डर द्यायला सुरुवात केली आहे. मधले एजन्ट काढून टाकले आहेत. रेट जास्त देतात. पण त्यामुळे मधल्या बिझिनेस चेनमधले डीलर, डिस्ट्रिब्यूटर वगैरे लोक अडचणीत आले आहेत. आता अशा छोट्या लोकांसाठी, नोकरदारांसाठी सरकारने काहीतरी केले पाहिजे.”

३.

जितेंदर हा बिहारमधील सीवान संसदीय क्षेत्रातला मूळ रहिवासी. आता पुण्यामध्ये बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंग कामगार म्हणून काम करत आहे.

“काय वाटतं तुम्हाला निवडणुकांमधल्या निकालांबद्दल?”

“मला काय वाटणार? लोकांनी त्यांना जे वाटतं तसं निवडून दिलेत.”

“पाच वर्षांमध्ये केलेल्या कामांमुळेच निवडून दिलं असणार ना!”

“कुठे काय केलं पाच वर्षात त्यांनी?”

“मग कसे निवडून आले?”

“मला काय माहीत? लोकांचा मूड कसा असेल कोण सांगू शकतं?”

“पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांमधून काहीतरी समजत असेल ना!”

“आमच्या सिवान क्षेत्रात नाही त्यांना निवडून दिलं. हीना शहाबना दिलं ना” (हे चुकीचं आहे. सिवान लोकसभा मतदारसंघात जदयुच्या कविता सिंग निवडून आल्यात.)

“पण बाकी देशभर तर लोकांनी भाजपला पसंती दिलीच आहे. ते कशामुळे? हिंदू-मुस्लिम मुळे की विकासामुळे की आणखी कशामुळे?”

“तुम्हाला सांगू का, हे सगळं पाकिस्तानवर हल्ले केले त्यामुळे झालंय.”

“फक्त तेवढ्यामुळे?”

“हो. तोपर्यंत जनतेचा मूड विरोधातला होता. शेवटच्या तीन महिन्यात बदलला. शिवाय इतके दिवस हे करू ते करू असं सांगत आहेत पण केलं काहीच नाही. तर पुढच्या पाच वर्षात तरी करतील असंही लोकांना वाटतंय.”

“तुमच्या काय अपेक्षा आहेत नव्या सरकारकडून?”

“हेच की पाच वर्षांत जे काही केलं नाही ते आता तरी करावं.”

४.

उत्तम घुगे हे एका सोसायटीमध्ये वॉचमनचं काम करतात.

“कालच्या निवडणुकांच्या निकालाबद्दल तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे.”

“माझी काय प्रतिक्रिया असणार. काही चांगलं झालं. काही वाईट झालं.”

“ते तर झालंच, पण पुन्हा तेच सरकार निवडून आलंय. तर तुम्हाला काय वाटतं?”

“सरकार कुठलं आलं म्हणून आपल्याला काय फरक पडतो हो? आपलं काम तर असंच चालू राहणार.”

“पण तरी तुमच्याही काही अपेक्षा असतीलच ना! त्यानुसारच तुम्ही मत दिलं असणार ना!”

“तसं काय नाही आपलं. पण काही काही चांगली जुनी लोकं पडली त्याचं वाईट वाटतं.”

“म्हणजे कोण?”

“शिवाजीराव आढळराव पाटील. सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे.”

“मग आता नवीन सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?”

“महागाई कमी करावी एवढीच अपेक्षा आहे. गॅस साडेसातशे झालाय. साडेतीनशेवरून एवढा वाढलाय. बाकी पण गोष्टी अशाच महाग होत चालल्या आहेत. तेवढं जरा कंट्रोल केलं पाहिजे.”

५.

मनीष हा बीकॉमचा विद्यार्थी कॉलेजबरोबर घरच्या किराणा दुकानातही काम करतो.

निवडणुकीसाठी वोटिंग केलं होतं का?

हो. या वर्षी पहिल्यांदाच.

मग निकालाबद्दल काय वाटतं?

अरे, मोदीजी तर येणारच होते. त्यांच्याशिवाय दुसरं कोण आहे का?

का? काँग्रेस आहे की!

कोण? राहुल गांधी? (असं म्हणून तो हसला.)

पण तरी एवढं बहुमत मिळेल असं वाटलं होतं का?

नाही. तितकं नव्हतं वाटलं. लोक नोटाबंदीनंतर आणि जीएसटीबद्दल जरा नाराज होते.

तू नव्हता का नाराज?

नाही. लोकांच्या नाराजीचा विचार करत बसलं तर देश कधीच पुढे जाणार नाही.

पुढे जाणार म्हणजे काय?

म्हणजे जगात नाव व्हायला पाहिजे. आत्ता तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी आहे. चीन आणि अमेरिकेला पण मागे टाकेल आता. मोदी है तो मुमकिन है!

६.

सुनीतीताई गृहिणी आहेत.

“लोकसभा निवडणुकींच्या निकालाबद्दल तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे.”

“माझी प्रतिक्रिया म्हणालात तर मी खूप हॅपी आहे. माझी फार इच्छा होती की त्यांना आणखी पाच वर्षं मिळावीत. मागच्या पाच वर्षात जी काही चांगली कामं झाली आहेत ती आणखी पुढे जावीत.”

“कोणती चांगली कामं जरा स्पष्ट करून सांगू शकाल का?”

“मुख्य म्हणजे स्वच्छता अभियान. ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि मी टीव्हीवर नेहमी त्यांना पाहते ना, मला त्यांची बोलण्याची पद्धत फार आवडते. अगदी शांतपणे सगळं ऐकून घेऊन शांतपणे उत्तरं देतात. ते मला फार आवडतं. बाकी गृहिणी म्हणून म्हणाल तर महागाई काही कमी होणार नाही हे तर आता सगळ्यांनाच माहिती आहे. मी ३५ वर्षे संसार करत आहे तर महागाई कधीच कमी झाली नाही. आणि गॅस वगैरे वाढत जाणारच आहे. आणि त्याने काही फार फरकही पडत नाही असं मला वाटतं. कारण आता लोक पाच-पाच आकडी पगार पण घेत आहेत ना. मग डाळी वीस रुपयांनी वाढल्या तर त्याने काही फार फरक पडत नाही. पण त्यांनी नोटाबंदी करून चाप लावलाय सगळ्यांना. काळा पैसा बाहेर काढला. शिवाय ते सर्जिकल स्ट्राईक वगैरे केलं तेही आवडलं. शांतपणे गाजावाजा न करता त्यांना प्रत्युत्तर दिलं. ठाम निर्णय घेणं महत्त्वाचं असतं.”

“विरोधकांनी मागच्या पाच वर्षांमधल्या कामगिरीबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले होते.”

“हो, मीही राज ठाकरे यांची सगळी भाषणं ऐकली. पण ते सगळे मुद्दे फालतू होते, त्यांच्यामध्ये काहीही अर्थ नव्हता असंच मला वाटतं. बाकी कुणाचं भाषण वगैरे मी ऐकलं नाही.”

“मग पुढच्या पाच वर्षात आणखी काय काय व्हावं असं वाटतं?”

“स्वच्छतेचं काम चालू राहीलच. त्यांना आणखी पाच वर्षं मिळाल्यामुळे प्रोत्साहन मिळून आणखी हुरूप येईल कामाचा. तसंही पाच वर्षं हा फार कमी काळ होता काही करण्यासाठी. आता यापुढे भ्रष्टाचारावर आणखी काहीतरी केलं पाहिजे. अजूनही जिथे तिथे काम करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. पण ते नक्की करतील याच्यावर काहीतरी. त्या नीरव मोदी, किंगफिशरचा मल्ल्या यांनाही नक्की परत आणतील आणि शिक्षा करतील अशी खात्री आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने तरी अतिशय चांगला निकाल लागला आहे.”

निकालानंतरच्या सर्वसामान्यांच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया!

निकालाबद्दल काय वाटते याविषयी आम्ही प्रामुख्याने पुणे येथे वेगवेगळ्या स्तरांतल्या, वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांशी बोललो. मात्र पुण्याचा काही भाग बारामती तर काही भाग शिरूर मतदारसंघात येत असल्यामुळे या तीनही मतदारसंघातल्या लोकांशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला.

काही थोडे लोक वगळता बहुतेकांना हा निकाल काहीसा अपेक्षित होता, मात्र तरीही भाजपला इतके मोठे बहुमत मिळणे अनपेक्षित होते. एक नक्की की इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्यामुळे निवडणुका, त्यामध्ये सहभागी पक्ष, नेते यांच्याबद्दल सर्वांना काही ना काही माहिती होती, त्याबद्दल त्यांची मते तयार झाली होती. एक महत्वाची गोष्ट अशी की निवडणुकांमध्ये आपल्या रोजच्या जीवनात फारसा काही बदल घडणार नाही असे जवळजवळ सगळेच म्हणाले, पण तरीही देश प्रगती करेल असा भाजप समर्थकांना जितका विश्वास आहे तितकीच देश विनाशाकडे वाटचाल करत आहे अशी भीती भाजप विरोधकांना वाटते.

आजवर पूर्ण न केलेली आश्वासने सरकारने पूर्ण करावीत ही सर्वांचीच अपेक्षा आहे. त्याचबरोबर आर्थिक आघाडीवर काही ठोस काम करावे, रोजगारासाठी काहीतरी करावे आणि महागाई कमी करावी याच लोकांच्या नव्या सरकारकडून प्रमुख अपेक्षा आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button