breaking-newsमनोरंजन

समाजाचे प्रतिबिंब ‘मुळशी पॅटर्न’

आर्थिक विकासाला चालना देणारे प्रकल्प राबवायचे म्हटलं की त्यासाठी जमीन आवश्यक असते, त्यातही मोठ्या शहरांच्या आसपासच्या जमिनीचे भाव गगनाला भिडले तरी तीच जमीन हवी यासाठी प्रयत्न होतात, मग काहीही करून जमीन मिळवायची, वाट्टेल ती किंमत द्यायची, प्रसंगी अवैध मार्गाचा वापर केला जातो. अनेकदा आपण या संदर्भातील बातम्या वाचतो. अशाच विषयावर लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ भाष्य करतो.

मुळशी तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाची ही कथा आहे. सखाराम (मोहन जोशी) आपली वडिलोपार्जित जमीन विकून पैसे संपल्यानंतर शेवटी त्याच बिल्डरच्या हाताखाली वॉचमनची नोकरी करत आहे. त्याचा मुलगा राहुल (ओम भूतकर) जमीन विकल्याच्या कारणावरून आपल्या वडिलांना सतत टोमणे मारत असतो. हातातून जमीन आणि राहतं घर गेल्यानंतर राहुल, सखाराम, राहुलची आई (सविता मालपेकर) आणि बहीण गाव सोडून पुणे शहरात रोजगाराच्या शोधात येतात. रोजीरोटीसाठी वडील मार्केट यार्डमध्ये हमालीची कामे  करतात. दरम्यान राहुल एकदा किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत जेलमध्ये जातो. तिथे त्याची भेट नन्या भाई (प्रविण तरडे)शी होते. राहुल जेलमधून बाहेर आल्यानंतर आपल्या भाईला खूष करण्यासाठी वाट्टेल ते काम करायला तयार होतो. काही वर्षांत तो पोलीस, कायदे या सगळ्याच्या पलिकडे गेलेला असतो. तर दुसरीकडे त्या भागातील इन्स्पेक्टर कडू (उपेंद्र लिमये) यांच्या मते ‘गुन्हेगारी संपवायची असेल तर आधी गुन्हेगार संपला पाहिजे. ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघायला हवा.

प्रविण तरडे यांच्या कथेत तसे फार काही नवीन नाही, मात्र त्यांनी ही कथा नजरेतून दाखवली आहे ती हटके आहे. ही कथा मुळशी तालुक्याची जरी असली तरी शहराच्या बाजूला संपत चाललेल्या प्रत्येक गावाला ती लागू होते. जमीन विकल्यावर एक पिढी नाही तर पुढच्या अनेक पिढ्यांचं नुकसान होते. सगळेच गुन्हेगार होतात असं नाही. पण गुन्हेगारीसारखा सोपा मार्ग अनेकजण जवळ करतात हे वास्तव आहे. ‘मुळशी पॅटर्न’ चा  विषय साधा, सरळ असला तरी त्याची मांडणी दमदार झाली आहे. चित्रपटातील अनेक संवाद प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतात. मध्यंतरापर्यंत चित्रपट प्रेक्षकांची पूर्ण पकड घेतो,; पण मध्यंतरानंतर कथेचा  वेग कमी झाला आहे. पण पडद्यावर सतत काहीतरी घडत असतं आणि त्यात आपण गुंतून जातो.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर ओम भूतकरने राहुल ही भूमिका अक्षरश: जगला आहे. त्याने साकारलेला राहुल कधी आपल्याला चीडही आणतो तर कधी कधी डोळ्यात पाणी. मोहन जोशी यांनी पाटलाची व्यक्तीरेखा उत्तम रेखाटली आहे. राहुलचा जीवलग मित्र गण्या क्षितीश दातेने उत्तम वठवला आहे. तर उपेंद्र लिमयेचा इन्स्पेक्टर कडू, सुनील अभ्यंकर यांचा वकिल लक्षात राहतो. महेश मांजरेकर, प्रविण तरडे, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिलां आहे.

एकंदरीत सांगायचे उत्तम पटकथा, दमदार संवाद, सुंदर गाणी आणि महेश लिमये यांचे उत्कृष्ट छायांकन असा सर्वच बाजूंनी उत्तम असलेला मुळशी पॅटर्न एकदा चित्रपटगृहात जाउन बघायलाच हवा.

चित्रपट – मुळशी पॅटर्न
निर्मिंती – अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि
दिग्दर्शक – प्रविण विठ्ठल तरडे
संगीत – नरेंद्र भिडे 
कलाकार – मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, ओम भूतकर, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर, क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा 
रेटिंग – ३.५

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button