breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

समस्त बारणे कुटूंबियाची बंडखोरी, खासदार श्रीरंग बारणेंच्या पथ्यावर !

  • पाच नगरसेवकांचा खासदारांवर लेटर बाॅम्ब
  • मावळची उमेदवारी आमदार जगतापांना द्या, बारणे कुटूंबियांची आग्रही मागणी  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंना त्यांच्याच बारणे कुटूंबियातूनच विरोध होवू लागला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बारणे कुटूंबियातील पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र  दिले आहे. त्या पत्रातून मावळमधून भाजपची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप यांना द्या, अशी आग्रही मागणी केली आहे. दरम्यान, मावळची जागा शिवसेनेच्या वाट्याला असून मागील दोन टर्म शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. आता भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. जागा वाटपाच्या चर्चेतून पालघर घ्या, अन् मावळ द्या, अशी भूमिका भाजपने घेतली होती. तरीही मावळवर शिवसेनेचाच दावा असेल, अशी शिवसेनेने ठाम भूमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपही झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातोश्री’वर जाऊन थेट उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी केली. भाजपने पालघरची जागा शिवसेनेला द्यायचे मान्य केले आहे. पालघरच्या बदल्यात भाजपने शिवसेनेकडे मावळची मागणी केली आहे. मात्र, या मागणीवर शिवसेनेने अद्याप कोणताही निर्णय दिला नसल्याचे समझते आहे.  रायगड आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदार संघातून 2009 मध्ये मावळ लोकसभा मतदार संघाची निर्मिती करण्यात आली. यामध्ये कर्जत, उरण, पनवेल, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघातून शिवसेनेकडून गजानन बाबर आणि विद्यमान खासदार म्हणून श्रीरंग बारणे हे आहेत.   

मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. मागील लोकसभा निवडणूकीत खासदार बारणेंकडून आमदार जगतापांना पराभव स्विकारावा लागला होता. त्याच पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आमदार जगतापांनी चंग बांधला असून मावळ लोकसभेची उमेदवारीसाठी भाजपकडे रेटा लावला आहे. तसेच चिंचवडच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजप नगरसेवकांनी पत्र देवून मावळ लोकसभेची जागा भाजपला द्या, अन्यथा शिवसेना खासदारांचा निवडणूकीत पराभव झाल्यास भाजपचे कार्यकर्ते जबाबदार राहणार नाहीत, असा इशारा दिला. 

याशिवाय शिवाजीनगर येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मावळ लोकसभेची जागा भाजपला घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवडचे पंधरा ते वीस नगरसेवक उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्याना दिलेले पत्र चिंचवडच्या बारणे कुटूंबियातील पाच नगरसेवकांनी दिले आहे. या पाच नगरसेवकांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यात नगरसेविका झामाबाई बारणे, माया बारणे, अर्चना बारणे,  नगरसेवक कैलास बारणे आणि नगरसेवक अभिषेक बारणे यांचा समावेश आहेत.

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदार संघाची जागा भाजपकडे घ्यावी, तसेच पिंपरी,चिंचवड विधानसभेचा आणि स्थानिक प्रश्नांचा विचार करता मावळची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप यांना द्यावी, अशी आमची समस्त बारणे कुटूंबियातील नगरसेवकांची इच्छा आहे, या मागणी विचार करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.  

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेने युती केली आहे. दोन्ही पक्षाकडून लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटप केले आहे. भाजपने शिवसेनेला पालघरची जागा दिली असली तरी सुध्दा मावळची जागा शिवसेनेकडेच असेल आणि त्यावर शिवसेनेचाच झेंडा कायम असेल, असे सुतवाच एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button