breaking-newsमनोरंजनमुंबई

समलैंगिकांचं विश्व उलगडणारा ‘कशिश’ चित्रपट महोत्सव

मुंबई : समलैंगिकांमध्ये लोकप्रिय असणारा कशिश हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या वर्षी १२ ते १६ जून दरम्यान मुंबईत होणार आहे. या चित्रपट महोत्सवाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. जगभरातील समलैंगिकांच्या विश्वावर प्रकाश टाकणारा अशियातील सर्वात मोठा समलैंगिक चित्रपट महोत्सव म्हणून कशिश  महोत्सवाची ओळख आहे. समलैंगिकांना अडचणीचे ठरणाऱ्या घटनेच्या ३७७व्या कलमावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर होणारा महोत्सव असल्यामुळे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय़ वेगळेच असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर ‘ओव्हर द रेनबो’ अशी यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे. या वर्षीची संकल्पना स्पष्ट करताना महोत्सवाचे संचालक श्रीधर रंगायन यांनी सांगितले की, ‘कशिश चित्रपट महोत्सव आणि गेल्या दहा वर्षांतील समलैंगिकांचा लढा या दोन्ही बाबी हातात हात घालूनच पुढे जात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्हाला स्वांतत्र्य मिळाले असले तरी अजून बराच लढा बाकी आहे. समलैंगिकांचे विवाह, त्यांचे सामाजिक आयुष्य अशा अनेक बाबींचा विचार करावा लागेल. इतकी वर्षे आम्हाला स्वीकारले जाण्याची कायदेशीर लढाई होती. यापुढे आमचे रोजच्या जगण्याचे प्रश्न घ्यावे लागतील. त्या अनुषंगानेच महोत्सवातील चित्रपटांचे नियोजन केलेले आहे.’

समलैंगिकाचे जीवन, त्यांच्या आयुष्यातील प्रश्न, त्यांना करावा लागणारा संघर्ष अशा अनेक विषयांवरील पूर्ण लांबीचे चित्रपट, लघुचित्रपट, माहितीपट, विविध चर्चासत्रे असे याचे स्वरूप असते. या वेळेचा कशिश चित्रपट महोत्सव लिबर्टी चित्रपटगृहात होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी कशिश महोत्सवाच्या वेबसाइटवर नावनोंदणी करता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button