breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘सत्ताधारीच बनले कचरा समस्या निर्माते’, पाहणी दौरा म्हणजे निव्वळ ढोंग

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी काढले भाजप पदाधिका-यांचे वाभाडे
  • स्मार्ट वाकड आणि पिंपळे सौदागरलाही लागला कच-याचा कलंक

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अडीच ते तीन वर्षात कच-याची समस्या सोडविता आली नाही. ओला व सुखा कचरा वेगवेगळा करण्यासाठी नागरिकांना सांगितले जात आहे. गाड्यांची उंची जास्त असल्यामुळे महिलांना कचरा गाडीत टाकताना हात पोहोचत नाहीत. भाजप पदाधिका-यांनी आजपर्यंत कोणत्याच कामाचे नियोजन व्यवस्थित केले नाही. यामध्ये प्रत्यक्ष काम करणा-या अधिका-यांचा त्यांनी अक्षरशः ‘फुटबॉल’ केला आहे. कचरा समस्या निर्माण करणारेच आज प्रभागांचा पाहणी दौरा करू लागले आहेत, अशी टिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ऐन पावसाळ्यातच कच-याची समस्या ज्वलंत बनली आहे. कचरा संकलन करण्यासाठी गाड्या उपलब्ध नसल्याचे कारण समोर करून नागरिकांना वेड्यात काढले. आता गाड्या आल्या परंतु, त्याही 50 टक्केच खरेदी केल्या. तरी कचरा समस्या अधिकच गंभीर रूप धारण करत आहे. भाजपचेच नगरसेवक तुषार कामठे यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या आवारात कचरा टाकून प्रशासनाचा निषेध केला. त्यावर जागे झालेल्या सत्ताधा-यांनी आजपासून प्रभागांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. कार्यतत्पर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समितीचे दस्तुरखुद्द सभापती विलास मडिगेरी यांनी नगरसेवक कामठे यांच्या प्रभागात जाऊन कच-याची पाहणी केली. त्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्यकर्ते माऊली कस्पटे आणि संदीप काटे यांनी सडकून टिका केली आहे.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, सत्ताधारी भाजपने निव्वळ पोरखेळ चालवला आहे. त्यांना कच-याचा प्रश्न सोडवित येत नाही. ते शहराचा विकास काय करणार आहेत, अशी चिंता वाटू लागली आहे. ज्या नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून निवडून दिले. तेच आता भाजपच्या कामकाजाबाबत चिंता व्यक्त करू लागले आहेत. नागरिकांना आता पश्चाताप होत आहे. आर्थिक हितसंबंध जोपासण्यापलीकडे भाजपच्या पदाधिका-यांना काहीएक दिसेना झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. कचरा समस्या ही मानवनिर्मित समस्या आहे. आपणच कचरा समस्या निर्माण करायची आणि पाहणी करण्यासाठी सुध्दा आपणच पुढे जायचे, असा उपराठा कारभार सुरू आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना अडचणीत आणण्याचा उद्योग भाजपने लावला आहे, अशा शब्दांत साने यांनी पदाधिका-यांचे वाभाडे काढले आहे.

भाजप नगरसेवकांची केवळ चमकोगिरी

ज्ञानेश्वर कस्पटे म्हणाले की, वाकडमधील दत्तमंदीर, यमुनागर, पोलीस लाईन, कस्पटे वस्ती, विशालनगर, पिंपळे निलख, पिंपळे निलख गावठाण या संपूर्ण पट्ट्यातील कचरा संकलन करण्यासाठी एकच गाडी सुरू आहे. गाडी आठ-आठ दिवस येत नसल्यामुळे घरात, घराच्या आजुबाजूला, सासायट्यांमध्ये कच-याचे ढीग साचत आहेत. कच-यामुळे घरात किडे निर्माण होत आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजरोजी चार दिवसातून एकदा कचरा संकलीत केला जातो. अगदी शंभर मीटर अंतरावर गाडी फुल भरत आहे. एकदा गाडी कचरा खाली करण्यासाठी गेली की, दुस-या दिवशीच त्याठिकाणी येत आहे. एका गाडीला हा भाग पूर्ण होणे शक्य नाही. गाड्या वाडविण्याची गरज आहे. नवीन गाड्या पुरेशा नसतील तर जुन्या गाड्या सुरू ठेवणे गरजेचे आहे. प्रभागातील नगरसेवक केवळ चमकोगिरी करण्यासाठी लोकार्पण सोहळा घेतात. त्यानंतर प्रश्न सुटला की समस्या जैसे थेच आहे, याची पाहणी केली जात नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत.

प्रशासनावर सत्ताधा-यांचा वचक नाही

संदीप काटे म्हणाले की, विश्वशांती कॉलनीच्या 45 मीटर रस्त्याच्या कोप-यावर कच-याचा ढीग आहे. हा कचरा दररोज वाढतच चालला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी करतात तरी काय, असा प्रश्न आहे. सोसायट्यांमध्ये कचरा संकलीत करून दुर्गंधी निर्माण होत आहे. सोसायट्यांमध्ये गाड्या वेळेवर येत नाहीत. सोसायट्यांव्यतिरिक्त भागातील कचरा गोळा केला जात नाही. त्यामुळे हा कचरा टाकायचा कोठे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. महापालिकेने कचरा गाड्या वाढविण्याची गरज आहे. सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे प्रशासन व्यवस्थित काम करत नसल्याचे दिसत आहे. ऐन पावसाळ्यात पिंपळे सौदागरमधील नागरिकांचे हाल सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button