breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई

सचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येची कबुली सचिन अंदुरे या तरुणाने दिल्यामुळे या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात अंधुरेचा साधा उल्लेखही नव्हता. परंतु राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने केलेल्या कारवाईत अंधुरेचे नाव पुढे आले. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचा दावा सीबीआयच्या प्रवक्तयाने केला आहे.

डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करीत असून या प्रकरणी सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्र तावडे यांना पनवेल येथून २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोघा मारेकऱ्यांची रेखाचित्रे सीसीटीव्ही फुटेजवरून रेखाटण्यात आली होती. त्यानुसार हे दोन मारेकरी म्हणजे सारंग अकोलकर व विनय पवार असावेत असा सीबीआयचा दावा होता. डॉ. तावडे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करताना सीबीआयने पुण्यातील न्यायालयात हीच माहिती सादर केली होती. अकोलकर आणि पवार या दोघांना फरारी दाखविण्यात आले होते. या दोघांनी तावडे यांची मोटरसायकल वापरून डॉ. दाभोळकर यांची हत्या केली, असेही सीबीआयचे म्हणणे होते. परंतु राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने गेल्या आठवडय़ात नालासोपारा येथे कारवाई करून मोठा शस्रसाठा हस्तगत करताना वैभव राऊत, अनंत कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर अशा तिघांना अटक केली. त्यापैकी कळसकर याच्या जबानीवरून डॉ. दाभोळकर यांच्या हत्येची उकल झाल्याचा दावा एटीएसने केला आहे. कळसकर हा मारेकऱ्यांपैकी एक होता आणि अन्य मारेकरी अंधुरे असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयने कारवाई करीत अंधुरेला अटक केली. मात्र त्यामुळे सीबीआयचा आतापर्यंतचा तपास चुकीचा होता, असे स्पष्ट झाले आहे. मात्र खरे मारेकरी गजाआड होणे आवश्यक असून अंधुरेने कबुली दिल्यामुळे डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे, असा दावाही सीबीआयच्या प्रवक्तयाने केला. अशा संवेदनाक्षम प्रकरणात तपासात काही त्रुटी राहू शकतात, असे या प्रवक्तयाचे म्हणणे आहे. सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रात मारेकरी म्हणून ज्या दोघांची नावे नमूद करण्यात आली आहेत त्यांना गोळीबार करताना पाहिल्याचे साक्षीदारही सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ते साक्षीदार जर अकोलकर आणि पवार यांच्याकडे मारेकरी म्हणून बोट दाखवित असतील तर त्याचा फायदा अंधुरेला होऊ शकतो, याकडे या प्रवक्तयाचे लक्ष वेधले असता, अद्याप या प्रकरणी तपास सुरू असल्यामुळे अधिक काही भाष्य करणे योग्य होणार नाही, असा युक्तिवाद त्याने केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button