breaking-newsमुंबई

संपामुळे ‘बेस्ट’ला १५ कोटींचा फटका

  • आजवरचा सर्वाधिक लांबलेला संप

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून पुकारलेला संप हा आतापर्यंतचा सर्वाधिक लांबलेला संप ठरला आहे. त्यामुळे बेस्टला १५ कोटींहून अधिक महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

यापूर्वी बेस्ट कर्मचाऱ्यांनी १९९७, २००७ आणि २०११ मध्येही संप केले होते. २०१७ मध्ये सानुग्रह अनुदान व अन्य मागण्यांसाठी एक दिवसाचा संप झाला होता. त्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्टला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला. त्याआधी बेस्ट कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त तीन दिवसांचे संप केले आहेत. १९९७मध्ये शरद राव अध्यक्ष असताना तीन दिवसांचा संप झाला होता. त्यानंतर २००७ मध्ये उत्तम खोब्रागडे महाव्यवस्थापक असताना काही कामगारांना तडकाफडकी काढण्यात आले होते व नवीन कामगार भरती करण्यात आली होती. तर २०११ मध्येही विविध मागण्यांसाठी तीन दिवसांचा संप करण्यात आला होता. परंतु यंदा ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेला संप दीर्घकालीन ठरला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता शिवसेना नेते उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हस्तक्षेप करूनही संप मिटलेला नाही. त्यामुळे संपाच्या सातव्या दिवशीही मुंबईकरांना एसटी, रिक्षा, टॅक्सी, खासगी बस यांसह अन्य पर्यायी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागले. याबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘संपामुळे आमचा महसूलही बुडाला आहे. प्रवाशांचेही हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे.’

मनसेचे आंदोलन

बेस्ट संपावर तोडगा निघत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसेनेही आंदोलन केले. मनसेच्या कुलाबा विभागातील कार्यकर्त्यांनी चिराबाजार येथील मेट्रोचे काम रोखले. घोषणाबाजी करून मेट्रो कर्मचाऱ्यांना बाहेरही काढले. नवी मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांसाठी जादा गाडय़ादेखील सोडल्या आहेत. त्यांचा मुंबईकरांना आधार मिळत आहे. मात्र नवी मुंबईच्या बस कर्मचाऱ्यांनीदेखील बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवत, मुंबईतील सेवा काही दिवस बंद करावी अशी मनसेची मागणी आहे. सोमवारी चेंबूरच्या पांजरापोळ सर्कल येथे चेंबूर विधानसभा अध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेच्या सात ते आठ बस रोखून धरल्या. प्रवाशांनाही मनसे कार्यकर्त्यांनी बाहेर काढले. पोलिसांनी पांजरापोळ सर्कल येथे धाव घेतली. मात्र तोपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी पोबारा केला होता. अखेर पोलीस बंदोबस्तात नवी मुंबई महानगरपालिकेची बस सेवा सुरू करण्यात आली. गोराई, बोरिवली मनसेचे नेते दिनेश साळवी यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांसह प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीच्या गाडय़ा रोखल्या.

संप एसटीच्या पथ्यावर

बेस्ट संप सुरू झाल्यापासून एसटी महामंडळ दररोज जादा बस गाडय़ांची सेवा मुंबईकरांना देत आहे. त्यामुळे एक ते सव्वा लाख रुपये महसूल एसटीला मिळत असल्याची माहिती देण्यात आली. सोमवारी महामंडळाने १६० बस गाडय़ा सोडल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button