breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

आळंदी –  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाठी वारी सोहळ्यासाठी आज (शुक्रवारी) प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला. माउलींच्या प्रस्थान सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून अनेक छोट्यामोठ्या दिंड्या दाखल झाल्या. रथापुढे सत्ताविस दिंड्या, रथामागे दोनशे एक आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे तीनशेहून अधिक
दिंड्या वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीत आल्या आहेत.  या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दोन लाख भाविक आळंदीत दाखल झाले होते.

गेले दोन दिवस झाले पाऊस पडत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे. शुक्रवार सकाळपासून वातावरण ढगाळ होते. मात्र दिवसभर उन सावल्यांचा खेळ सुरू होता. पावसाने थोडीसी उघडीप दिल्याने वारकऱ्यांमधे उत्साह होता. शहरात ठिकठिकाणी राहू्ट्या आणि धर्मशाळांमधून वारकऱ्यांच्या टाळमृदंगाचा जयघोष अन् हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण सुरू होती.

माउलींच्या समाधी मंदिरात पहाटे सव्वादोनला काकडा आरती, पवमान अभिषेक झाल्यानंतर पहाटे चार ते बारापर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात आले. नऊ ते अकरा वीणा मंडपात कीर्तन सोहळा पार पडला. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत माउलींच्या नैवेद्यासाठी दर्शनबारी बंद ठेवून समाधी मंदिराचा गाभारा स्वच्छ करून महानैवेद्य दाखविण्यात आला.  दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला.

त्यानंतर माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने पोशाख चढविण्यात आला. पोशाखानंतर गुरू हैबतबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची आरती, त्यानंतर संस्थानच्या वतीने आरती करण्यात आली. तसेच माउलींच्या पादुका प्रस्थानासाठी वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न करण्यात आले. तसेच संस्थानतर्फे मानकऱ्यांना पागोटेवाटप, गुरू हैबतबाबांच्या वतीने दिंडीप्रमुखांना नारळ प्रसाद, माउलींच्या समाधीजवळ संस्थानतर्फे नारळ प्रसाद दिला गेला. त्यानंतर माउलींच्या पालखीचे वीणा मंडपातून सायंकाळी सहाच्या दरम्यान देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान करण्यात आले.

दरम्यान, पहाटेपासून माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी गर्दी होती. दर्शनासाठीची रांग नदीपलिकडे गेली होती. माउलीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिगेटिंग करून फक्त दिंड्यांनाच सोडण्याचे नियोजन केले होते. माउलींच्या मंदिराकडे जाणाऱ्यांना प्रस्थान काळात इतरांना प्रवेश बंदी होती. दुपारच्या प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी वारकऱ्यांची पावले मंदिराच्या दिशेने सरकत होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button