षण्मुखानंद सभेतर्फे वीरपत्नी व वीरमातेचा गौरव
भारताच्या ७२व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून षण्मुखानंद सभेतर्फे देशासाठी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या सहा भारतीय जवानांच्या वीरपत्नींचा आणि एका जवानाच्या आईचा गौरव करण्यात आला. यावेळी भारताची ‘वंडर वूमन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पहिल्या आणि एकमेव विंग कमांडो ट्रेनर डॉ. सीमा राव यांना या सोहळ्यात ‘षण्मुख शौर्य रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
किंग सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ब्रिगेडियर प्रदीप कुमार हसिजा, कर्नल नीलम छाब्रा आणि षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर उपस्थित होते.
षण्मुखानंद सभा आणि भारतीय सेनेच्या जनरल ऑफिसर कमांडिंग (महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वीरपत्नी आणि वीरमातांना ५० हजारांपासून दोन लाख रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला.
सीमा राव यांनी आतापर्यंत तिन्ही दलातील मिळून १५ हजार कमांडोंना प्रशिक्षण दिले आहे. तसेच १५ राज्यांमधील पोलीस दलांनाही गेल्या २० वर्षांपासून त्या कोणताही मोबदला न घेता प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी भारतीय आणि अमेरिकी विद्यापीठांमधून पीएच.डी., लंडनमधून व्यवस्थापन क्षेत्रात एम.डी. अशा पदव्या प्राप्त केल्या आहेत.
गेल्या वर्षीही २०१६ साली देशासाठी शहीद झालेल्या सहा वीरपत्नींचा आणि युद्धात जखमी झालेल्या २५ वीर जवानांचा गौरव करण्यात आला होता.