‘श्रीरंगा’ची थेट ‘चंद्ररंग’वर धाव’… प्रचारासाठी जगताप यांना लोटांगण !
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वैर आता संपुष्टात आल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीत दोघांमधील वितुष्ट संबंध परभवाला कारणीभूत ठरू नयेत, यासाठी शिवसैनिक म्हणून डरकाळी फोडणारे खासदार श्रीरंग बारणे यांनी एक पाऊल मागे घेत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची आज भेट घेतली.
मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा वारू चौफेर उधळलेला असताना खासदार बारणे यांनी अचानक आमदार जगतापांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात बारणे यांनी एक पाऊल मागे घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर, बारणे समर्थकांनी त्यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. शेवटी विजयासाठी जगतापांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आपल्यावर आलीच की. अशा शब्दांत काही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार बारणे यांनी पिंपळे सौदागर येथील जगतापांच्या चंद्ररंग बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. तब्बल एक तास राजकीय चर्चा झाली. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. जगतापांच्या बोलण्यावरून युतीचाच प्रचार करण्याचा सूर बाहेर पडत होता. परंतु, जगताप हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात. बारणे यांना शब्द देऊन ते युतीचे काम प्रामाणिकपणे करतील का, हा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात कायम आहे.