breaking-newsराष्ट्रिय

शिवस्मारकाच्या उंचीवरून भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

विधानसभेत गदारोळ, राजदंड पळवला ! 
चार वेळा कामकाज तहकूब 
नागपूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची कमी करण्याचा मुद्दा विरोधक उपस्थित करत असताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मंगळवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. भातखळकर यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या विरोधकांसह, सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केल्याने गदारोळ होऊन चार वेळा कामकाज तहकूब करावे लागले. अखेर आपले “ते’ शब्द मागे घेत भातखळकर यांनी सभागृहाची व महाराष्ट्राची माफी मगितल्यानंतरच या गोंधळावर पडदा पडला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शून्य प्रहरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा विषय सभागृहात उपस्थित केला. अरबी समुद्रातील शिवस्मारक हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असून सरकारने मूळ आराखड्यात बदल करून पुतळ्याची उंची कमी करून तलवारीची उंची वाढविली असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर स्पष्टीकरण करताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी समुद्राच्या लाटा, वाऱ्याचा वेग याचा अभ्यास करून तज्ञांनी नवीन आराखडा तयार केला असल्याचे सांगितले. विधानभवन परिसरातील पुतळे व त्यांच्या चबूतरयांच्या उंचीची माहिती देताना विरोधक या विषयाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात केवळ घोषणा झाल्या. परंतु आम्ही या स्मारकाच्या उभारणीसाठी सर्व परवानग्या मिळवल्या.
विरोधक मात्र केवळ लोकांची दिशाभूल करत आहेत. शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान भाजपाच्या अतुल भातखळकर यांनी विरोधकांनी मध्येच हा विषय उपस्थित केल्याबद्दल आक्षेप घेतला. सभागृहाचे कामकाज सुरु असताना असले भलते विषय समोर आणताहेत अशा आशयाचे वक्तव्य केले. यामुळे विरोधक संतप्त झाले व त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी सुरू केली. कॉंग्रेसच्या अब्दुल सत्तार व अन्य सदस्यांनी तर थेट व्यासपीठावर जाऊन राजदंडच ताब्यात घेतला.
यामुळे प्रचंड गदारोळ होऊन सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. यानंतर कामकाज सुरू झाले तेव्हा ‘तो’ शब्द आपण छत्रपती शिवरायांसाठी नव्हे तर पृथ्वीराज चव्हाण यांना उद्देशून वापरला होता अशी सारवासारव भातखळकर यांनी केली. परंतु त्यामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी अतुल भातखळकर यांना निलंबित करण्याची मागणी केली. शिवसेना सदस्यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळत भातखळकर यांच्या विधानाला जोरदार आक्षेप घेतला.
भातखळकरांचा माफीनामा ! 
विरोधक व शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने अतुल भातखळकर यांनी सदनाची आणि महाराष्ट्राची माफी मागितली. परंतु विरोधकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरल्याने आणखी दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. अखेर अध्यक्षांनी गटनेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढला. अध्यक्षांनी भातकळकर यांना सभागृहात कडक भाषेत समज देऊन या प्रकरणावर पडदा टाकला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button