breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

शिवसंग्राम कार्यकर्त्यांच्या घाईमुळे बोटीला अपघात?

दुर्घटनेची पोलीस चौकशी सुरू

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभासाठी निघालेल्या एमआरएम-१ स्पीड बोटीचा अपघात शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घाईमुळे घडला का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

बोटीने घेतलेला जवळचा मार्ग आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक यामुळे दुर्घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी बोट अधिक वेगाने चालवण्यासाठी किंवा ती जवळच्या मार्गाने नेण्यासाठी दबाव आणला होता, या दृष्टीनेही पोलीस तपास करणार आहेत.

पायाभरणी समारंभासाठी आमदार, मुख्य सचिव, प्रकल्पाशी संबंधित शासकीय अधिकारी, पत्रकारांसाठी चार बोटींचे नियोजन होते. त्यापैकी संस्कृती नावाची बोट मुख्य सचिव, आमदार आणि काही अधिकाऱ्यांना घेऊन निघाली. त्यामागोमाग सागरी पोलिसांची गस्त घालणारी बोट जाणार होती. त्यानंतर एमआएम-१ बोट निघणार होती. बोटीत क्षमतेहून दुप्पट प्रवासी कोंबण्यात आले. त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. गोंधळात पोलिसांच्या बोटीआधी एमआरएम-१ बोटी निघाली. त्यामागोगाम निघालेल्या पोलीस बोटीला ती पुढे दिसली नाही. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी अपघात झाला तो भाग खडकाळ आहे. तेथे याआधी काही बोटी अपघातग्रस्त झाल्या होत्या. त्याची कल्पना बहुतांश बोटचालकांना आहे. त्यामुळे हा खडकाळ भाग टाळण्यासाठी मोठा वळसा घालून सर्व बोटी समारंभस्थळी जाणार होत्या. असे असताना एमआरएम-१ने जवळचा असलेला खडकाळ मार्ग का निवडला? बोटीचा वेग का वाढवला? याचा तपास केला जाईल. पोलीस बोटीनंतर ही बोट निघाली असती तर बोटचालकांनी वेग नियंत्रित ठेवला असता आणि त्याने वेगळा मार्गही निवडला नसता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

बोटीचा अपघात आणि त्यात झालेला सिद्धेश पवारचा मृत्यू याला जबाबदार कोण, हे निश्चित करण्यासाठी सर्व दृष्टीने तपास केला जाईल.

– प्रवीण कुमार पडवळ, अतिरिक्त पोलीस आयुक्त

सागरी पोलिसांचे कौतुक

दुर्घटनेची माहिती मिळताच सागरी पोलिसांनी तातडीने हालचाल करून अनेकांचे जीव वाचवले. त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंदर विभाग, सागरी पोलिसांची पाठ थोपटली. अपघाताची माहिती गस्तीवर असलेल्या सागरी पोलिसांच्या मुंबई-१० बोटीला सर्वप्रथम मिळाली. या बोटीतून शासकीय अधिकारीही समारंभस्थळी निघाले होते. या बोटीने तातडीने बंदर विभाग, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला वर्दी दिली. पुढे नौदल, तटरक्षक दलाला मदतीसाठी बोलावण्यात आले. तत्पूर्वी बंदर विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक मच्छीमार आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधून तीन मोठय़ा बोटी दुर्घटनास्थळी पाठवल्या. त्यामुळे बचावकार्य त्वरित सुरू झाले आणि बुडणाऱ्या बोटीवर अडकून पडलेल्या २४ जणांना सुरक्षित किनाऱ्यावर आणने शक्य झाले.

चौकशी समितीबाबत बैठक

मुंबईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभावेळी बोट बुडून एकाचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची मेरिटाइम कायद्यानुसार चौकशी करण्याबाबत मुख्य सचिव डी. के. जैन यांनी गुरुवारी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुमार यांच्याबरोबर बैठक घेतली. समितीचे स्वरूप, कार्यकक्षा आणि अहवालाच्या मुदतीबाबत या वेळी चर्चा झाली. एक-दोन दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल. शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली एमएमआरएम-१ ही स्पीड बोट बुधवारी खडकावर आदळून बुडाली. ही बोट वेस्ट कोस्ट मरिन यॉट सव्‍‌र्हिसेस प्रा. लि. या खासगी कंपनीची असल्याचे उघडकीस आले आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या एका कार्यकर्त्यांचा भाचा असलेल्या सिद्धेश पवार या सनदी लेखापाल असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाच्या  पार्थिवावर गुरुवारी  दुपारी शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

बोटीबाबतही चौकशी..   एमआरएम-१ बोट कोणत्या कंपनीची होती, तिची क्षमता किती होती, परवाना होता का, नियमित तपासणी होत होती का, किती वर्षे वापरात होती हे तपासले जाणार आहे. अपघाताची नेमकी माहिती बोटचालक देऊ शकेल, असा पोलिसांचा अंदाज आहे. अपघात झाला तेव्हा तोही बोटीत अडकून पाण्याखाली गेला होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्याने पोलीस त्याचा जबाब घेऊ शकले नव्हते.

सूचना धुडकावल्या..  २० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बोटीत ४० प्रवासी चढले. यात कार्यकर्ते आणि काही माध्यमप्रतिनिधींचा समावेश होता. पोलिसांनी धोक्याची जाणीव करून २० प्रवाशांना बोटीतून उतरण्याचे आवाहन केले. सुरक्षेच्या सूचनाही केल्या. मात्र पोलिसांना धक्काबुक्की करत, हुज्जत घालत शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी त्या धुडकावून लावल्या. अखेर काही माध्यमप्रतिनिधी उतरले, तर आठ ते दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरश: हाताला धरून बोटीतून खाली उतरवले, असे समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button