breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शिवनेरी परिसरात सातवाहनकालीन वस्तूंचे संग्रहालय!

शिवकालीन शस्त्रास्त्रांचाही समावेश; ८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

पुणे : सातवाहन राजवटीतील राजधानी तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर सातवाहनकालीन वस्तू संग्रहालय आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्रहालय साकारणार आहे.

शिवनेरी परिसराच्या विकासासाठी शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पा अंतर्गत हे संग्रहालय विकसित करण्यात येईल. त्यासाठी ८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पा अंतर्गत शिवनेरी तसेच जुन्नर परिसरातील विविध शिवकालीन आणि पुरातन वास्तूंच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले असून प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर शिवनेरी आणि जुन्नर परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुरातत्त्वशास्त्र आणि इतिहासाचे अभ्यासक या भागाला आवर्जून भेट देतात. जुन्नर तालुक्याला इसवीसनपूर्व इतिहास आहे. या इतिहासाची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी   शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय तसेच सातवाहनकालीन वस्तू संग्रहालयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

जुन्नर येथील सह्य़ाद्री गिरिभ्रमण संस्था, पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे वस्तू संग्रहालय साकारेल. या संग्रहालयासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार आढळराव पाठपुरावा करत होते. पर्यटकांना इतिहासाची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शिवनेरीवर संग्रहालय करावे, अशी मागणी सह्य़ाद्री गिरिभ्रमण संस्थेकडून शासनाकडे वेळोवेळी करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना त्याबाबत पत्र देण्यात आले होते, अशी माहिती सह्य़ाद्री गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी दिली.

या मागणीची दखल घेऊन  तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्रहालयाला तत्त्वत: मान्यता दिली होती. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाचे जुन्नर विभागाचे संरक्षक सहायक बी. बी. जंगले यांनी अंबरखाना इमारतीच्या संवर्धनाला सुरुवात केली. मात्र, काही काळानंतर हे काम पुढे सरकले नाही. त्यानंतर खासदार आढळराव यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांनी विद्यमान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक उषा शर्मा यांच्याशी पत्रव्यवहार केला. सह्य़ाद्री गिरिभ्रमण संस्थेने डेक्कन कॉलेजला हा प्रकल्प साकारण्याबाबत विनंती केली. त्यानंतर डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. वसंत शिंदे यांनी शिवनेरी आणि जुन्नर परिसरात वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला.

डॉ. शिंदे यांनी जुन्नर परिसराला नुकतीच भेट दिली. जुन्नर नगर परिषदेच्या जिजामाता उद्यानातील जागा देण्याची मागणी त्यांनी केली असून नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच ही जागा डेक्कन महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचेही खत्री यांनी सांगितले.

जुन्नर ही सातवाहनांची पहिली राजधानी होती. या भागात रोमन आणि ग्रीक राज्यकर्त्यांची मोठी वसाहत होती. या भागात करण्यात आलेल्या उत्खननातून या बाबी समोर आल्या आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या लोकसंस्कृतीची माहिती सामान्यांना, पर्यटकांना तसेच अभ्यासकांना उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संग्रहालाय साकारण्यात येणार आहे.

– डॉ. वसंत शिंदे, कुलगुरु, डेक्कन कॉलेज, पुणे (अभिमत विद्यापीठ)

अंबरखाना ही वास्तू वापरात आणल्यानंतर तेथे संग्रहालय उभारणे शक्य होईल. प्रकल्प उभारणीसाठी लागणारी परवानगी तसेच निधीसाठी मी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांशी संपर्क साधला आहे. या विभागांकडे पाठपुरावा करत आहे.

– शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button