breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहर स्वच्छतेसाठी पक्षनेते पवार आणि सभापती मडिगेरी उतरले मैदानात

  • प्रभाग क्रमांक 26 मधील कच-याची केली पाहणी
  • आरोग्य कर्मचा-यांना कचरा उचलण्याचे दिले आदेश

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग 26 पिंपळे निलख परिसरातील नागरिकांचा कचरा उचलला जात नसल्यामुळे स्थानिक नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेच्या आवारात कचरा टाकून आंदोलन केले. त्यावर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी आज कामठे यांच्या प्रभागात अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावर पवार आणि मडिगेरी यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना फैलावर घेतले.

सत्तारूढ पक्षनेते पवार आणि स्थायी समिती अध्यक्ष मडिगेरी यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गोफणे आणि अधिकार्‍यांना सोबत घेऊन हा पाहणी दौरा केला. त्यांनी  शहरातील रावेत, वाकड, डांगे चौक, पिंपळे निलख, विकासनगर, किवळे, पिंपळे गुरव, सांगवी आदी भागांची सकाळी 6 ते 10 या वेळेत प्रत्यक्ष पाहणी केली.

कचरा प्रश्न गंभीर बनल्यामुळे नगरसेवक कामठे यांनी बुधवारी (दि. 10) पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे वातावरण तापलेले असतानाच आज सकाळी पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी कामठेंच्या प्रभागाची पाहणी केली. नवीन गाड्या, पुरेसे कर्मचारी असताना कचरा प्रश्न गंभीर बनतोच कसा, असा प्रश्न उपस्थित करत पवार यांनी आरोग्य कर्मचा-यांना जाब विचारला. स्थायी समिती सभापती मडिगेरी यांनी पडलेला कचरा का उचलला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. पालिकेच्या सर्वच प्रभागामध्ये कच-याच्या समस्येवरून वाद सुरू आहेत. पक्षनेते आणि सभापतींनी आजपासून प्रत्येक प्रभागाचा पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरूवात प्रभाग क्रमांक 26 पासून करण्यात आली आहे.

प्रभागात पाहणी दौरा करून पवार आणि मडिगेरी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना डोअर टू डोअर कचरा आणि रस्त्याच्या बाजूचा कचरा उचलण्याच्या सूचना केल्या. कर्मचारी येत आहेत, मात्र गाड्या नसल्यामुळे कचरा उचलला जात नाही. कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची चुक नसून ठेकेदारांची चूक असल्याचे नगरसेवक तुषार कामठे यांनी निदर्शनास आणून दिले. पाहणीदौरा झाल्यानंतर महापालिकेत आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पक्षनेते पवार, सभापती मडिगेरी यांची बैठक झाली. लवकरात-लवकर शहर स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी दिले.  महापालिकेच्या 50 गाड्या कचरा उचलण्यासाठी देण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button