breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पवना धरणात मुबलक पाणी असताना भेडसावणा-या पाणी टंचाईला कारणीभूत ठरलेल्या अनधिकृत नळजोडांची अधिकृत संख्या एकूण 12 हजार 842 आहे. आजअखेर अनधिकृत नळजोडाचे अधिकृत जोड करण्यासाठी 3 हजार 960 प्रकरणे प्राप्त झाले असून त्यापैकी एकूण 2 हजार 809 प्रकरणे मंजूर झाली आहेत. आता अधिकृत नळजोड करून घेण्याची मुदत संपल्याने पाणी पुरवठा विभाग कायदेशीर कारवाई करणार आहे.

पुरेसा पाऊस होऊन पवना धरण शंभर टक्के भरल्याचे पाठबंधारे विभागाने जाहीर केलेले असताना सुध्दा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात टंचाईचा सामना करावा लागला आहे. काही दिवसानंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांची उदासिनता आणि महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आज देखील त्या टंचाईची मगरमिठ्ठी नागरिकांच्या मानगुटीवर कायम आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकृत सर्व्हेनुसार आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 12 हजार 842 अनधिकृत नळजोड आहेत. अनधिकृत नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी या विभागाने 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती. प्रतिसाद कमी मिळाल्याने 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढविण्यात आली. या विभागातून 4 हजार 419 अर्जांची विक्री झाली. त्यापैकी या विभागात 3 हजार 960 लोकांनी अर्ज सादर केले. त्यापैकी 2 हजार 809 नळजोड अधिकृत करण्यात आले आहेत. तर, पुर्ततेअभावी 53 अर्ज नामंजूर आहेत. 1 हजार 98 अनधिकृत नळजोडांची प्रकरणे शिल्लक आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.

नव्याने निर्माण झालेल्या ‘ह’ प्रभागात सर्वाधिक 5 हजार 567 अनधिकृत नळजोड आहेत. तर, निगडी, प्राधिकरणाचा परिसर असलेल्या ‘अ’ प्रभागात सर्वाधिक कमी 202 अनधिकृत नळजोड आहेत. नियमीत करण्यासाठी 103 जणांनी अर्ज केले असून संपूर्ण अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ‘ब’ प्रभागाच्या हद्दीत 2 हजार 340 नळजोड अनधिकृत असून त्यापैकी 1 हजार 121 नागरिकांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील 694  अर्ज मंजूर झाले आहेत. ‘क’ प्रभागाच्या हद्दीत आजमितीला एकही अनधिकृत नळजोड नसल्याची नोंद आहे.

‘ड’ प्रभागाच्या हद्दीत 1 हजार 724 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी 443 जणांनी नियमितीसाठी अर्ज केले होते. त्यातील 175 मंजूर झाले आहेत. ‘ई’ प्रभागात आजघडीला एकही अनधिकृत नळजोड नसल्याचा पाणी पुरवठा विभागाचा खुलासा नमूद आहे. ‘फ’ प्रभागात एक हजार 908 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी नियमित करण्यासाठी 1 हजार 714 जणांनी अर्ज केले आहेत. त्यातील 1 हजार 547 प्रकरणे मंजूर झाले आहेत. ‘ग’ प्रभागाच्या हद्दीत 1 हजार 168 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी 422 नागरिकांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील 342 अर्ज मंजूर झाले आहेत. ‘ह’ प्रभागात सर्वाधिक 5 हजार 767 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी केवळ 157 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील केवळ 20 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button