breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शहरातलं गाव : आंबेगाव : विकासाचा चेहरा

शहराच्या परिघावरच्या उपनगरांना झालर क्षेत्र असे संबोधले जाते. पुण्याच्या दक्षिणेला, कात्रजजवळील आंबेगाव परिसर अशा झालर क्षेत्रातच येतो. आंबेगावची ठळक वैशिष्टय़े जाणून घेताना संमिश्र लोकवस्ती, मध्यमवर्गीयांचे प्राबल्य, दोन हमरस्त्यांची जोड, नामवंत शैक्षणिक संकुलांचे सान्निध्य, विकसित होणारी पर्यटनस्थळे, शिवसृष्टीचा प्रकल्प, नवी जुनी मंदिरे, श्रद्धास्थाने, हमरस्त्यानजीकची भव्य मंगल कार्यालये, बांधकाम, पूरक साहित्याचे, वाहतुकीचे व्यवसाय.. असे खूप काही आंबेगावबाबत सांगता येईल.

इथे शिक्षणाने आलेली समृद्धी आहे, माणुसकी आहे, सर्वपक्षीय सामंजस्य आहे. विकासासाठी धडपड आहे. समृद्ध निसर्गाचा वरदहस्त इथे जाणवतो, दाट झाडी, पोषक हवा, मुबलक पाणी, असे सर्व काही आहे. उपनगरांमध्ये फिरताना त्या त्या भागामध्ये मूळ गावठाण भाग पाहणे जरुरीचे असते. इतर भागांप्रमाणेच इथेसुद्धा मंदिरे आधुनिक स्वरूपात जीर्णोद्धारित झालेली पाहिली. चव्हाटय़ाच्या जागा असलेले पार आता काँक्रीटच्या इमारतींनी वेढलेले आहेत. भैरवनाथ, फिरवाई माता, मारुती, पांडुरंग, राम, दत्त, लक्ष्मी आई, काळूबाई इ. दैवतांची मंदिरे आता नव्या रूपात सजली आहेत. पौष पौर्णिमेच्या वार्षिक जत्रेमध्ये परंपरागत छबीना, बाहेरगावचे ढोल ताशांच्या खेळांबरोबर सनई चौघडय़ांचे गाडे असतात. या दिवशी घराघरातून पुरणपोळीचा नैवेद्य असतो. दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजल्यापासून लावण्यांचे कार्यक्रम सुरू होतात. पहाटे चार वाजता पालखीचे मानकरी ओलेत्यानेच पूजा करतात. प्रतेनुसार भैरवनाथांकडून चौंडाई देवीला साडी-चोळीचा आहेर देण्यासाठी वऱ्हाडासारखीच मिरवणूक निघते.

गावठाण भागासमोरच ओढय़ाकाठी काळूबाई देवीचे मंदिर आहे. मंदिरानजीक विहीर असून, गोमुख आहे. विहिरीचा उपसा नियमित होत असल्याने उपयुक्तता टिकून आहे. धार्मिक वृत्तीच्या गावकऱ्यांनी आणि त्यांच्या नव्या पिढय़ांनी, एकोपा जीवापाड जपला आहे. वार्षिक जत्रेच्या काळात गावात एकही फ्लेक्स लागत नाही. दुष्काळी परिस्थितीत उत्सव साधेपणाने करून पाण्याची टाकी गावकऱ्यांनी बांधली, हे प्रगत विचाराचे लक्षण आहे. अण्णा कोंढरे यांचे भजनी मंडळ गावोगाव संस्कार करीत आहे.

शहरानजीकच्या बहुसंख्य गावांप्रमाणेच आंबेगावमध्येदेखील जिरायती शेती हाच उपजीविकेचा मुख्य व्यवसाय होता. बेलदरे, कोंढरे, जाधव, दळवी, फाले, दांगट ही मूळ घराणी आहेत. गावाच्या विकासात आणि संस्कार परंपरा सांभाळण्यात संभाजी बेलदरे, अण्णा कोंढरे पाटील, शहाजी बेलदरे, यमुनाबाई जाधव, शंकरराव बेलदरे, सखाराम वासवंड, मारुती बेलदरे, विनायक कोंढरे, दत्तात्रेय फाले इ. जुन्या जाणत्या मंडळींचा मोटा सहभाग होता.

पुण्याच्या दक्षिण भागाच्या विकासात त्या भागातील नामवंत शिक्षण संस्थांचे योगदान मोठे आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटी, भारती विद्यापीठ, सिंहगड इन्स्टिटय़ूट, पूना इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, जयंत शिक्षण प्रसारक मंडळी, सरहद, प्रियदर्शिनी अशा शिक्षण संस्थाव्यतिरिक्त हिंद स्वराज्य ट्रस्टचे विद्यार्थिनींसाठी भव्य वसतिगृह आणि खासगी तसेच मनपाच्या पंधरापेक्षा अधिक शाळा या परिसरात आहेत. शिवसृष्टी हेदेखील आंबेगावचे भव्य स्वप्न आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या पुढाकाराने हा प्रकल्प सध्या ४० टक्के पूर्ण झाला आहे. शिवकालीन इतिहासाची दृकश्राव्य माहिती या वास्तूमध्ये दिली जाणार आहे.

आंबेगाव आणि परिसराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या परिसरात छोटे-मोठे असे सातशेपेक्षा अधिक कारखाने आहेत. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, शिक्रापूर, कोल्हापूर, बेळगाव येथील बडय़ा उद्योगांना येथून पुरवठा होतो, असे संजय मते यांनी सांगितले.

आंबेगाव परिसराला उत्तम नैसर्गिक पाश्र्वभूमी लाभली आहे. त्याचा सुयोग्य वापर केल्यास अल्हाददायक विश्व उभे राहू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामीनारायण मंदिर! नेत्रसुखद, शरीराला आणि मनाला शांती देणारी ही वास्तू, परिसराचे मांगल्य आणि सौंदर्य वाढवीत आहे. ओघानेच या भागाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक महत्त्व वाढत असते. शिवगोरक्ष ट्रस्ट संचालित मठ याच परिसरात आहे. सद्गुरू नानामहाराज मंडलिक यांच्या निर्वाणानंतर २००५ साली या मठाची स्थापना झाली. संस्थेतर्फे वर्षभर अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. श्रीकांत लिपाणे यांच्या अ‍ॅक्टीव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून जांभूळवाडी तलाव परिसरात आबालवृद्धांसाठी चालू असलेल्या प्रकल्पांची मी समक्ष माहिती घेतली. शिवांजली मंडळाचे अंकुश जाधव यांनी गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबवले आहेत. परिसर विकास समितीच्या माध्यमातून शंतनू पेंढारकर, मधुकर वाळुंजकर, प्रदीप आढाव यांनी विकासकामांचा, सूनियोजित पाठपुरावा केला आहे. आंबेगाव खुर्दमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल असून, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार संस्थेचे अध्यक्ष आहेत.

परिसर विकासासाठी कार्यरत असलेल्या नव्या पिढीचा उल्लेख अपरिहार्य आहे. दीपक बेलदरे, तानाजी दांगट, सुनील चिंधे, संतोष ताठे, ईश्वर फाले, सुधीर कोंढरे, देवीदास जाधव, दिनेश कोंढरे, सिद्धार्थ वनशीव, विक्रम वासवंड आणि अरुण राजवाडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

दक्षिण पुण्याची सखोल माहिती आणि जनसंपर्क असलेले माजी सैनिक, पत्रकार बजरंग निंबाळकर तसेच नगर नियोजन क्षेत्रातील पुणे मनपाचे अनिरुद्ध पावसकर यांचे लेखनसंदर्भ वरील लिखाणासाठी उपयुक्त ठरले, त्याची कृतज्ञतापूर्वक नोंद करावी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button