शरयू नदीच्या किनारी श्रीरामाची १५१ मीटर उंच मूर्ती उभी राहणार
उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शरयू नदीच्या किनारी प्रभू श्रीरामाची १५१ मीटर उंचीची मुर्ती उभारण्यात येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी शनिवारी रात्री याची घोषणा केली. विशेष म्हणजे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे ही मुर्ती साकारणार आहेत.
श्रीरामाच्या या भव्य मूर्तीसाठी पाच मूर्तीकारांनी आपले मॉडेल सादर केले होते. यांपैकी मराठी असलेले प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या मॉडेलला मंजूरी देण्यात आली. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार आहेत. भारतीय संसदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांचा पुतळाही राम सुतार यांनी साकारला आहे.
रामाची ही प्रस्तावित मूर्ती त्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित अशा प्रकारे साकारण्यात येणार आहे. यामध्ये धनुर्धारी राजा, मर्यादा पुरुषोत्तम या रामाच्या प्रतिमेचा यातून आभास निर्माण होईल.