breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज संभाव्य उमेदवारांची चाचपणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या, गुरुवारी मुंबईत पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीत काँग्रेसबरोबर आतापर्यंत जागावाटपाबाबत झालेल्या वाटाघाटी, पक्षाच्या वाटय़ाला येणारे मतदारसंघ, काही जागांबाबत निर्माण झालेला पेच, इत्यादी मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.

दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत अनेक बैठका झाल्या. त्यात ४८ पैकी ४४ जागांवर समझोता झाला आहे. परंतु काही अदलाबदलीच्या मतदारसंघांवरून पेच निर्माण झाला आहे. त्यात प्रामुख्याने अहमदनगर व औरंगाबाद या दोन जागांचा वाद आहे. भाजप-शिवसेनेच्या विरोधातील मतविभाजन टाळण्यासाठी मनसेलाही आघाडीत घ्यावे, या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला वेगळे वळण लागले आहे. या पार्श़्वभूमीवर शरद पवार यांच्याच उपस्थितीत उद्या बैठक होत आहे.

माढा मतदारसंघासाठी पवारांना विनंती

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणाऱ्या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी त्यांना विनंती करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. देशातील राजकीय वातावरण सध्या बदललेले आहे, अशा वेळी पवार यांनी लोकसभेत असणे आवश्यक आहे, असे पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांचे मत आहे, असे पाटील म्हणाले.  आघाडीत जागावाटपाबाबत अजून चर्चा सुरू आहे. जागावाटपावर समझोता झाला की, आघाडीच्या म्हणून एकत्रित जागा जाहीर केल्या जातील. भाजप-शिवसेनेचा परभाव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button