breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शत्रुघ्न काटे यांचे नगरसेवक पद रद्द करा – कैलास कुंजीर

पिंपरी –    रहाटणी- पिंपळे साैदागरच्या प्रभाग क्रमांक 28 मधून भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे निवडून आले आहेत. त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र बोगस आढळले असून  त्या जात पडताळणी प्रमाणपत्राची फेरतपासणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शत्रुघ्न काटे यांचे नगरसेवक पद रद्द करुन पिंपळे सौदागर प्रभागात नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेवून त्यांना पत्र देण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 28 मधून इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) शत्रुघ्न काटे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे  कैलास कुंजीर यांनी निवडणूक लढविली. यामध्ये शत्रुघ्न काटे हे विजयी झाले. मात्र, महापालिका सार्वत्रिक निवडणूकीत शत्रुघ्न काटे हे हिंदू मराठा असून त्यांनी बोगस कुणबी दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप करीत बाळासाहेब काकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली आहे. तसेच न्यायालयाने काटे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करुन त्यांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे आदेश जात पडताळणी समितीला दिले आहेत.

याबाबत कैलास कुंजीर म्हणाले, काटे यांचा कुणबी दाखला महसूल अधिका-यांशी संगणमत करुन मिळविला आहे. कुणबी दाखला काढण्यासाठी काटे यांनी दाखल केलेल्या एकाही कागदपत्रांवर कुणबी जातीचा स्पष्ट उल्लेख नाही. तसेच त्यांच्या प्रतिज्ञा पत्रात नमूद वंशावळ व महसूल अभिलेखमध्ये कोणताही ताळमेळ लागत नाही. नगरसेवक काटे यांचे जात प्रमाणपत्राची चौकशी करण्यास विलंब झाला असून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. जात पडताळणी समितीसमोर तीन जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

काटे यांचे जात प्रमाणपत्र बोगस आहे. नागरी सुविधा केंद्र देखील आम्ही काटे यांना जात प्रमाणपत्र दिले असल्याचे ठामपणे सांगत नाही. त्यामुळे त्वरित नगरसेवक काटे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करुन या ठिकाणी नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केलेली आहे. तसेच याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्याशी देखील पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. मृणाल ढोले-पाटील, ओबीसी संघर्ष समितीचे प्रताप गुरव, आनंदा कुदळे, दिलीप बारणे  आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button