breaking-newsराष्ट्रिय

शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज

  • तब्बल 1 तास 43 मिनिटे दिसेल खग्रास स्थिती

पुणे – शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी (दि.27) आषाढ पौर्णिमेच्या रात्री होणार आहे. ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे चंद्रग्रहण 3 तास 55 मिनिटांचे असून त्यातील खग्रास स्थिती 1 तास 43 मिनिटे दिसेल.

खग्रास चंद्रग्रहणावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल आणि चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जाणार असेल तर एकूण ग्रहण कालावधी व खग्रास स्थितीही जास्त वेळ असू शकते. शुक्रवारी चंद्र पृथ्वीपासून जास्त दूर म्हणजे चार लक्ष सहा हजार किलोमीटरवर असेल. त्यामुळे चंद्राला पृथ्वीच्या छायेतून भ्रमण करण्यास जास्त वेळ म्हणजे तीन तास 55 मिनिटे लागतील. त्याचमुळे हे खग्रास ग्रहण सर्वांत मोठे आहे. हे ग्रहण अंटार्क्‍टिका, ऑस्ट्रेलिया, रशियाचा काही भाग, संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथून दिसेल.

शुक्रवारी रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ होईल. मध्यरात्री एक वाजता खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी खग्रास स्थिती संपेल, तर 3 वाजून 49 मिनिटांनी ग्रहण सुटेल. यापुढील अशी मोठी चंद्रग्रहणे 9 जून 2123 व 19 जून 2141 रोजी होणार आहेत. त्या वेळी खग्रास स्थिती 1 तास 46 मिनिटे दिसेल.

सध्या असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे हे ग्रहण दिसण्याची शक्‍यता कमी आहे. वैदिक शास्त्रानुसार ग्रहणाच्या काळात अन्न पाणी सेवन करुन नये, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर हे ग्रहण गर्भवती महिला व आजारी व्यक्तींनी शक्‍यतो पाहू नये असेही सांगण्यात आले आहे. ग्रहणाचे वेध हे सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार असल्याने शक्‍यतो त्यापूर्वी अन्न ग्रहण करावे.

मंगळ ग्रह येणार चंद्राजवळ

या वेळी चंद्रबिंबाच्या दक्षिणेस 7 अंशांवर मंगळ ग्रह दिसणार आहे. पावसाळा आकाश निरभ्र असेल, तेथून खग्रास चंद्रग्रहण व मंगळ दर्शनाचा लाभ घेता येईल. यानंतर पुढच्या वर्षी दि. 16 जुलैचे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button