breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘व्हीव्हीपॅट’मुळे लोकसभेचा निकाल लांबण्याची शक्यता

मुंबई – देशभरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २३ रोजी होणार आहे. यंदापासून मतमोजणीवेळी प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघातील व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्याही मोजल्या जाणार असल्याने प्रत्यक्ष निकाल हाती तीन ते चार तास विलंब लागण्याची शक्यता निवडणूक अधिकारी वर्तवत आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांना निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

यंदाच्या निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदानकेंद्रावर ईव्हीएम यंत्रणेसोबतच व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात आले. त्यामुळे आपण मत दिलेल्या उमेदवारालाच मत दिले गेले की नाही, याची खातरजमा मतदारांना त्याचवेळी करता आली. मात्र, विरोधी पक्षांनी गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीवरच आक्षेप घेत, सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम यंत्रात स्व-इच्छेनुसार फेरबदल केल्याचा आरोप केला. शिवाय ५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्यांची मोजणी केली जावी, यासाठी आधी निवडणूक आयोग आणि नंतर सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सर्वाेच्च न्यायालयाने विरोधकांची ही मागणी फेटाळत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदानकेंद्रातील व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्या मोजण्याची अनुमती दिली. याचाच अर्थ येत्या २३ तारखेला प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ३० मतदानकेंद्रातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेतील पावत्यांच्या बेरजेची पडताळणी होणार आहे.

व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी हाताने केली जाणार असल्याने त्यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार एका व्हीव्हीपॅटमधील पावत्या मोजण्यास किमान एक तास लागू शकतो. या अनुमानानुसार पाच मतदारसंघातील व्हीव्हीपॅटमधील पावत्यांच्या गणनेसाठी किमान तीन ते चार तासांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे दुपारनंतर कल समजू लागले, तरी अंतिम आकडेवारी रात्री दहा वाजल्यानंतरच कळू शकेल, असा निवडणूक अधिकाºयांचा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button