Uncategorizedआरोग्यमहाराष्ट्रमुंबई

वैद्यकीय शिक्षण परवडेना!

अभिमत विद्यापीठातील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ

वैद्यकीय अभ्यासक्रम महागल्यामुळे गुणवत्ता आणि इच्छा असूनही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे दिसत आहे. दुसरीकडे अभिमत विद्यापीठांनाही गुणवत्ता, शुल्क कपात अशा तडजोडी करण्याची वेळ आली आहे. अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याकडे आता विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचे कारण देत नामांकित अभिमत विद्यापीठांनी चक्क शुल्क कपात केली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांची राज्यातील संख्या ही यंदा जवळपास ७० हजार असतानाही अभिमत विद्यापीठांमधील जागा दुसऱ्या फेरीनंतरही रिक्त राहिल्याचे दिसत आहे. यंदा राज्यात जवळपास ७० हजार विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतून प्रवेशासाठी पात्र ठरले. शासकीय, खासगी वैद्यकीय, दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमता ही साधारण ८ ते १० हजार, तर अभिमत विद्यापीठांची प्रवेश क्षमता अठराशे आहे. यंदा अभिमत विद्यापीठांनी त्यांच्या शुल्कात जवळपास ८० टक्क्यांनी वाढ केली. प्रतीवर्षी किमान चौदा लाख ते कमाल २६ लाख रुपये या घरांत अभिमत विद्यापीठांचे शुल्क आहे. त्यानुसार चार वर्षांचा अभ्यासक्रम अधिक वसतीगृहाचा खर्च असे गणित करून अभिमत विद्यापीठातून डॉक्टरकीची पदवी मिळवण्यासाठी किमान ६० लाख रुपये ते दीड कोटी रुपयांपर्यंत खर्च येत आहे. पात्रता आणि इच्छा असतानाही केवळ शुल्काच्या अवाढव्य आकडय़ांमुळे विद्यार्थ्यांनी अभिमत विद्यापीठांमध्ये वैद्यकीय किंवा दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. केंद्रीय वैद्यकीय संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीनंतरही अभिमत विद्यापीठांमध्ये जागा रिक्त राहिल्या आहेत. अनेक नामवंत विद्यापीठांमध्ये दोन फेऱ्यांनतरही जवळपास २५ टक्के जागा रिक्त आहेत. याशिवाय परदेशी विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या कोटय़ाच्या जागाही रिक्त राहिल्या आहेत.

शुल्क कपातीची वेळ

ठरवेले शुल्क देऊ शकतील अशा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी दलालांची नेमणूक करणे, शुल्क कमी करणे असे प्रकार करण्याची वेळ अभिमत विद्यापीठांवर आली आहे. गुणवत्ता बासनात बांधून शुल्क भरण्याची क्षमता असल्यास अगदी काठावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. सर्वाधिक शुल्क असलेल्या पुण्यातील एका अभिमत विद्यापीठाला शुल्क कमी करण्याची वेळ आली. या विद्यापीठाचे शुल्क प्रतिवर्षी २६ लाख रुपये होते. याशिवाय पात्रता शुल्क ३ लाख ९० हजार रुपये तर वसतीगृहाचे शुल्क २ लाख ५ हजार ५०० रुपये असे होते. महाविद्यालयाने शुल्क ४ लाख रुपयांनी कमी केले. याशिवाय पात्रता शुल्कही ६० हजारांनी कमी करण्याची विनंती प्रवेश समितीकडे केली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सुबत्ताधारक विद्यार्थ्यांच्या शोधात असणाऱ्या अजूनही दोन विद्यापीठांचे शुल्क कमी होणार असल्याची चर्चा आहे.

कर्जही मिळेना..

अभिमत विद्यापीठाचे अवाढव्य शुल्क भरण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना कर्जही मिळू शकत नसल्याची स्थिती आहे. अभिमत विद्यापीठात प्रवेश मिळूनही शुल्क भरण्याची क्षमता नसल्याने प्रवेश घेता आला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘अर्ज सर्व ठिकाणी केले होते. शैक्षणिक कर्जासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचे नंतरचे व्याज भरणे आणि आताची आर्थिक स्थिती फुगवून दाखवणेही शक्य नाही. त्यामुळे प्रवेश घेतला नाही,’ असे औरंगाबाद येथील एका विद्यार्थ्यांने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button