breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

वैद्यकीय प्रवेशोत्सुकांचे तपशील दलालांच्या हाती

  • वीस लाख रुपयांमध्ये निश्चित प्रवेश मिळवून देण्याचे संदेश

मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे गुणानुक्रमांक, पालक, विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक असे सगळे तपशील प्रवेश करणाऱ्या दलालांच्या हाती लागला असून दहा किंवा वीस लाख रुपयांच्या मोबदल्यात नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे लालूच दाखवले जात आहे. प्रवेश करून देणाऱ्या विविध संस्थांच्या जाहिरातवजा संदेशांनी पालक हैराण झाले आहेत.

राज्यात शासकीय किंवा खासगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३ हजार ८७५ जागा तर दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या बाराशे जागा यंदा आहेत. मात्र त्यासाठी राज्यातील साधारण सत्तर हजार विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी  सध्या झाली असून विद्यार्थी दुसऱ्या फेरीच्या प्रतिक्षेत आहेत. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा किती असतील याबाबत संभ्रम असताना प्रवेश करून देणाऱ्या दलालांचा ससेमिरा पालकांमागे लागला आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तपशील दलालांच्या हाती लागले आहेत. प्रवेश करून देणाऱ्या विविध कंपन्यांचे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवणारे संदेश पालक आणि विद्यार्थ्यांना येत आहेत. महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्याचा मोबदला म्हणून १० ते २० लाख रुपयांचे देणगी शुल्क असल्याचे या संदेशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील महाविद्यालयांबरोबरच, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक येथील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची हमी या दलालांकडून दिली जाते. या शिवाय परदेशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून  देण्यात येईल अशा स्वरूपाचे हे संदेश आहेत. विद्यार्थ्यांचे नाव, माहिती, संपर्क क्रमांक असे तपशील या दलालांच्या हाती कसे लागले असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

दुसरी प्रवेश यादी जाहीर होण्यापूर्वीच प्रवेशाची हमी देणाऱ्या या संदेशांमुळे पालक अधिकच गोंधळून गेले आहेत. एखाद्या संदेशातील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर येणारे संदेश आणि कॉल्सचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे पालकांनी सांगितले. नियमित प्रवेश फेरीतून प्रवेश मिळणे कसे कठीण आहे हे ऐकवून पालकांना किंवा विद्यार्थ्यांना भरीस पाडण्याचे प्रयत्न या दलालांकडून करण्यात येत आहेत.

फसवणूकीचा धोका

आलेल्या संदेशांमध्ये देण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तातडीने बँकेत पैसे भरण्याची सूचना पालकांना देण्यात येते. पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्टातील काही नामांकित खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवून देण्याची हमी या दलालांकडून देण्यात येते. त्यासाठी १५ ते २० लाख रुपये मोबदल्याची मागणी केली जाते. घासाघीस केल्यावर अगदी ४ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर हे दलाल कबूल होतात. मात्र ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्याचे आश्वासन पालकांना देण्यात येत आहे त्यातील अनेक महाविद्यालयांचे शुल्कही ८ ते २० लाख रुपये प्रती वर्षी असे आहे. तेथे दहा ते २० लाख रुपये देणगी शुल्काच्या बदल्यात प्रवेश निश्चित करण्याची हमी हे दलाल देत आहेत.

व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश करण्याची हमी देण्याबरोबरच दुसऱ्या प्रवेश यादीतही प्रवेश निश्चित करण्याची लालूच हे दलाल पालकांना दाखवत आहेत. या सगळ्या प्रकारात विद्यार्थी फशी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकांना आलेल्या काही संदेशांमधील नावामागे डॉक्टर लावण्यात आले आहे. त्यामुळेही फसगत होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

दुसरी प्रवेश फेरी १२ ऑगस्टपासून

अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्याच्या निर्णयावरून पहिल्या प्रवेश फेरीबाबत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अखिल भारतीय कोटय़ातील प्रवेश प्रकियेनंतर दुसरी फेरी घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार आता १२ ऑगस्ट रोजी दुसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी १८ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. पहिल्या समुपदेशन फेरीसाठी (मॉप अप राऊंड) २१ ऑगस्ट रोजी यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button