breaking-newsपुणेमहाराष्ट्र

विषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा!

जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला

विषाणुजन्य ताप आला असता स्वत:हून अथवा डॉक्टरांनी लिहून दिलेली प्रतिजैविक  औषधे (अँटिबायोटिक) घेण्याकडे रुग्णांचा कल असतो, मात्र अशी प्रतिजैविके ही थंडीताप आणि विषाणूजन्य ताप बरा करीत नसल्याने अशा आजारात ती घेऊ नयेत, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘फ्लू’साठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रतिजैविके न घेण्याचा हा सल्ला दिला आहे. विषाणुजन्य ताप, थंडीताप यांसारखी लक्षणे दिसल्यास संपूर्ण विश्रांती घेणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याबरोबरच शिंकताना अथवा खोकताना नाक आणि तोंडावर रुमाल ठेवावा तसेच वारंवार हात धुवावे असा सल्लाही रुग्णांना देण्यात आला आहे. रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने विषाणू प्रतिबंधक औषधे घ्यावीत. मात्र प्रतिजैविके घेऊ नयेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने सूचनांमध्ये म्हटले आहे.  या बाबत जनरल फिजिशियन डॉ. सुहास नेने म्हणाले की, फ्लू हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णांना खरेतर प्रतिजैविके देण्याची आवश्यकता नसते. विषाणूजन्य तापाच्या बरोबरीने इतर संसर्ग उद्भवल्यास डॉक्टरांकडून प्रतिजैविक औषधे दिली जातात. अनेकदा रुग्णांकडूनच प्रतिजैविकांची मागणी केली जाते. मात्र प्रतिजैविक औषधांचे अनावश्यक सेवन केल्याने त्यांचा शरीरावरील प्रभाव कमी होत जातो आणि एखाद्या गंभीर आजारात रुग्णाला त्याने गुणच न येण्याचा धोका असतो.

डॉ. संजय पाटील म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला सल्ला योग्य आहे. मात्र रुग्णांना त्यामागचे कारण समजावणे आवश्यक आहे. ताप आला असता थेट औषध दुकानात जाऊन प्रतिजैविक औषधाची मागणी रुग्णांकडून केली जाते, डॉक्टरांकडेही तसा आग्रह धरला जातो. प्रत्यक्षात विषाणूजन्य ताप बरा करण्यासाठी पुरेशी विश्रांती, तसेच पॅरासिटामॉलसारखे ताप उतरण्यासाठीचे औषध पुरेसे ठरते. अनावश्यक प्रतिजैविके घेतल्याने आपले शरीर त्यांना सरावण्याची शक्यता असल्याने त्यांचे सेवन घातक ठरू शकते. गेल्या ३० वर्षांमध्ये नवीन प्रतिजैविकांचा शोध लागला नसल्याने अस्तित्वात असलेली प्रतिजैविक औषधेही जपून वापरणेही आवश्यक आहे.

अ‍ॅस्पिरीन, कॉम्बिफ्लाम, ब्रुफेन नको

विषाणुजन्य ताप आल्यास अ‍ॅस्पिरीन, ब्रुफेन, कॉम्बिफ्लाम अशी औषधे रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात. अशा रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असता या औषधांचे दुष्परिणाम दिसतात. प्लेटलेटची संख्या कमी होते. या औषधांमुळे रक्त पातळ होण्याची क्रिया वेगाने होत असल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अंतर्गत रक्तस्राव सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अ‍ॅस्पिरीन, कॉम्बिफ्लाम, ब्रुफेनऐवजी पॅरासिटामॉल घटक असलेली औषधे घ्यावीत, असे राज्याचे वैद्यकीय सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button