breaking-newsमनोरंजन

विचार करायला लावणारा 2.0

सुपरस्टार रजनीकांत जगातली कुठलीही अशक्य गोष्ट पडद्यावर साध्य करू शकतो. २०१० साली आलेल्या रोबोटमध्ये मानवाच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या तंत्रविज्ञान शक्तीचा दुष्परिणाम पडद्यावर आला होता. इथं त्याच विज्ञान शक्तीला निसर्ग आणि अतींद्रिय शक्तींची सोबत मिळाली आहे.

2.0 ही डॉ. वसीकरण (रजनीकांत) याची कथा आहे, त्याने यापूर्वी बनवलेला चिट्टी (रजनीकांत) हा कृत्रिम बुद्धी आणि मानवी भावभावनांचा एक अद्भूत अविष्कार असतो. पण चिट्टीच्या भावना त्याच्या बुद्धीवर हावी होतात तेव्हा तो हाताबाहेर जातो आणि उद्रेक करतो. त्याच्या अत्याचाराला कंटाळून चिट्टीची चिप काढून त्याला निष्प्रभ केले जाते. इथून 2.0 या चित्रपटाची कथा सुरू होते. शहरात अचानक मोबाईल फोन गायब व्हायला लागतात आणि हेच मोबाईल फोन नंतर लोकांवर आक्रमण करायला लागतात. यात लोकांचे बळी जातात. या आक्रमणापासून लोकांना वाचवण्यासाठी लष्कराला पाचारण केले जाते. पण लष्कराचाही उपयोग होत नाही. या स्थितीशी निपटण्यासाठी एक उच्चस्तरिय बैठक बोलवली जाते आणि या बैठकीत चिट्टीला पुन्हा जीवनदान देऊन लोकांची मदत करण्याची विनंती वसीकरणला केली जाते. यानंतर सुरू होते पक्षीराज (अक्षय कुमार) व चिट्टीतील घमासान. पक्षीराज लोकांवर आक्रमण का करतो? त्याच्या मोबाईल फोनच्या पराकोटीचा द्वेषामागे नेमके काय कारण असते? अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी 2.0 बघायला हवा.

प्रचंड बजेट, डोळे दिपवणारं ऍनिमेशन, ऍक्शन, ड्रामा, मेकअपवर प्रचंड मेहनत घेऊन वेगळय़ा रूपात समोर आलेला अक्षय कुमार आणि अर्थात सुपरस्टार रजनीकांत हे सगळं या सिनेमामध्ये खच्चून आहे. शिवाय अस्सल दाक्षिणात्य सिनेमात असतो तसा ‘देसी तडका’ही आहेच, सिनेमाची सुरुवात प्रभावी आहे. सुरुवातीला घडणारी एक आत्महत्येची घटना आणि त्यानंतर एकामागोमाग शहरातले सगळय़ांचे मोबाईल फोन गायब होण्याचं सत्र हे सगळं थ्रिलिंग वाटतं. चित्रपटात रजनीकांत असेल तर कथा, पटकथा, संवाद या दुय्यम असतात असे म्हटले जाते त्याला 2.0 अपवाद आहे

कलाकारांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर अक्षय कुमार नेहमीप्रमाणेच चोख आहे. त्याने केलेला पक्षीराज छान उभा राहिला आहे. आठ वर्षांपूर्वी रजनीकांतने साकारलेला डॉक्टर वशीकरण आणि आताचा वशीकरण या मध्ये इतकी वर्षे गेलीयत असं जराही वाटत नाही. इतर कलाकारांनी ही त्यांना उत्तम साथ दिली आहे.

भक्ष्य आणि भक्षक यांच्या नैसर्गिक चक्रातून नैसर्गिक संतुलन साध्य केलं जातं. पण माणूस याला अपवाद असतो. प्रगती, विकास आणि अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या शोधात तो निसर्गाला ओरबाडतो, त्याचे लचके तोडतो. हा तोच निसर्ग असतो जो समस्त जीवांच्या जगण्याचा मुख्य स्त्रोत, आधार असतो. निसर्गाला ओरबाडण्याचा हा राग सूड घेण्याच्या नकारात्मक प्रवृत्तीला हाताशी धरतो तेव्हा कमालीच्या विध्वंसाला सुरुवात होते. निसर्गाची हानी करून विज्ञान तंत्रज्ञानाचा धोके न पाहणारा सुखनैव जगण्याचा भास दाखवणारा असाच एक थ्रीडी काळा चष्मा आपण डोळ्यांवर चढवला आहे. हा चष्मा वेळीच काढून हा धोका डोळसपणे पाहायला हवा. असं सांगणार 2.0 एकदा बघायला हरकत नाही.

चित्रपट – 2.0

निर्मिती – ए. सुबस्करन, राजू महालिंगम

दिग्दर्शक – शंकर

संगीत – ए. आर. रहेमान

कलाकार – रजनीकांत, अक्षयकुमार, अॅमी जॅक्सन, अदील हुसेन, सुधांशु पांडे, अनंत महादेवन

रेटिंग – ***

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button