breaking-newsपुणेमहाराष्ट्र

वाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून

  • गुंडाच्या त्रासाला कंटाळून कायदा हातात घेतला
  • दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल

नशा करून देण्यात येणारा त्रास, वाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक अशा प्रकारच्या कृत्यांमुळे हडपसर भागातील राजीव गांधी कॉलनी परिसरातील नागरिक दहशतीखाली होते. शनिवारी दुपारी एका महिलेशी वाद झाल्यानंतर या गुंडाने महिलेच्या घरावर दगडफेक केली तसेच वाहनांची तोडफोड केली. अखेर महिला आणि तिच्या पतीने कायदा हातात घेतला. त्यांच्याबरोबर असलेल्या काही जणांनी गुंडाचा शोध घेऊन त्याला काठी आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.

अक्षय बाळासाहेब सोनवणे (वय २०,रा. तरवडे वस्ती, महमदवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तिघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अक्षयविरोधात हडपसर, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शनिवारी दुपारी त्याचा या भागातील रहिवासी लक्ष्मी थोरात यांच्याशी वाद झाला होता. या कारणावरून अक्षयने संध्याकाळी राजीव गांधी कॉलनी परिसरात वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या भागातील रहिवासी भयभीत झाले. रहिवाशांनी अक्षयला रोखण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी त्याने महिलांना धक्काबुक्की केली. लक्ष्मी थोरात यांच्या घरावर त्याने दगडफेक केली. त्यानंतर अक्षय तेथून पसार झाला.

लक्ष्मी थोरात, तिचे पती आणि आणखी काही जणांनी अक्षयचा शोध घेण्यास सुरूवात केली. तो घरी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर थोरात यांनी त्याचा राजीव गांधी कॉलनी परिसरात शोध घेतला. त्यांनी अक्षयला गाठले. लाठी-काठी तसेच लोखंडी गजाने त्याला बेदम मारहाण केली. थोरात कुटुंबीयांनी चढविलेल्या हल्लयात अक्षयचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात रात्री तणाव निर्माण झाला होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव भापकर तपास करत आहेत.

अक्षयविरोधात दहा ते अकरा गुन्हे दाखल आहेत. शनिवारी दुपारी त्याचा लक्ष्मी थोरात यांच्याशी वाद झाला होता. थोरात यांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेल्या अक्षयचा थोरात कुटुंबीयांकडून शोध घेण्यात येत होता. राजीव गांधी कॉलनी परिसरात तो लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला गाठून बेदम मारहाण केली, असे  वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांनी सांगितले.

अल्पवयीन असल्यापासून गंभीर गुन्हे

अल्पवयीन असताना अक्षय सोनवणे याने गुन्हे करण्यास सुरूवात केली होती. त्याच्याविरूद्ध हडपसर आणि वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. नागरिकांना त्रास देणे, दमदाटी करण्याचे प्रकार तो करत होता. त्याला अमली पदार्थाचे व्यसन होते. नशेत असलेला अक्षय नागरिकांना त्रास द्यायचा, अशी माहिती रहिवाशांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button