breaking-newsपुणे

वनविभागाच्या मदतीला ड्रोन, मोबाइल अॅप, सॅटेलाइट मॅपिंग

  • वृक्षलागवड, हरितक्षेत्राची देखरेख तसेच वृक्ष नोंदणीसाठी होणार उपयोग

पुणे – शहरातील वृक्षलागवड, हरितक्षेत्राची देखरेख तसेच वृक्ष नोंदणीसाठी वनविभाग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. ड्रोन, मोबाइल अॅप्लिकेशन, सॅटेलाइट मॅपिंग अशा सर्वच स्तरावरील तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये होणार आहे. यामुळे कामात सुटसुटीतपणा येऊन आणखी प्रभावीपणे काम करता येईल, असे वनविभागाने म्हटले आहे.

राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत वनविभाग सातत्याने विविध कामे करत आहे. यामध्ये वृक्ष लागवड, त्यांची देखरेख, हरितक्षेत्रांची तसेच वन्यप्राण्यांची देखभाल अशी विविध कामे केली जातात. मात्र, वनक्षेत्रांचा विस्तार लक्षात घेता, सध्या उपलब्ध मनुष्यबळ क्षमतेत एकाच वेळी सर्व भागांवर देखरेख करणे कठीण ठरत आहे. यामुळेच विभागाकदून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याच्या वापरावर भर दिला जात आहे. याबाबत विभागाचे सहायक वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले, “सध्या हरित क्षेत्रांवर देखरेख करण्यासाठी वन विभाग ड्रोनचा नियमित वापर करत आहे. यामुळे कमी वेळेत परिसरातील बराचशा भागाची माहिती घेता येते.

परिणामी, कर्मचाऱ्यांचा पाहणीचा वेळ वाचतो आणि उपायात्मक कार्याकडे जास्त लक्ष देता येते. जिल्ह्यातील प्रत्येक “रेंज’वर, तालुकास्तरावर सध्या ड्रोनचा उपयोग होत आहे. हे ड्रोन भाडेतत्वावर उपलब्ध केले जातात. लवकरच विभागातर्फे स्वत: ड्रोन विकत घेऊन त्याद्वारे जास्त परिणामकारक देखभाल केली जाईल.’

ड्रोन वापरासोबतच वृक्षारोपणाबाबत “सॅटेलाइट डाटा कलेक्‍शन’ आणि मोबाइल अॅप विकसित केले जात आहे. याद्वारे कोणते झाड कोणत्या परिसरात आहे, त्याची सद्यस्थिती काय, तेथे कोणत्या उपायात्मक कार्याची आवश्‍यकता आहे, याची माहिती उपलब्ध केली जाईल. हे अॅप सर्वसामान्य नागरिकही वापरू शकणार असल्यामुळे त्यांनाही माहिती सहज उपलब्ध होईल, असेही भावसार म्हणाले.

तंत्रज्ञान वापरातून होणारे फायदे :
– वृक्षसंपदेची “रिअल टाइम’ माहिती.
– कमी वेळेत, जास्तीत जास्त परिसराची माहिती मिळणार.
– संशयास्पद मानवी कारवाईवर वचक ठेवता येईल.
– वणव्यांसारख्या घटनांबाबत जलद माहिती मिळण्यास मदत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button